Join us

प्रचार थंडावला

By admin | Published: October 30, 2015 10:55 PM

उद्या मतदान : वैभववाडी, दोडामार्ग नगरपंचायत निवडणूक

वैभववाडी : वैभववाडी, दोडामार्ग नगरपंचायतींचा प्रचार शुक्रवारी सायंकाळी थंडावला. युतीचे दोन मंत्री, माजी मुख्यमंत्री, दोन आमदार, तीन माजी आमदार अशा भाजप, शिवसेना आणि काँग्रेसच्या बड्या नेत्यांच्या दौऱ्यामुळे दोन्ही नगरपंचायतींच्या निवडणुकीचे वातावरण महिनाभर ढवळून निघाले होते. वैभववाडीतील धमकीचे पडसाद, विकास आघाडीच्या बिनविरोध नगरसेवकांचे पाठिंबानाट्य आणि प्रचार समाप्तीच्या पूर्वसंध्येला दिलेला धमकीचा तक्रार अर्ज या घटनांमुळे वैभववाडीचे वातावरण काहीसे तापले होते. प्रचार थंडावल्यानंतर वैभववाडी आणि दोडामार्ग शहरात पोलिसांनी संचलन केले. नामनिर्देशनपत्र भरण्याच्या अंतिम टप्प्यात वैभववाडी आणि दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीला रंग चढू लागला होता. मात्र, दोडामार्गचे वातावरण अगदीच थंड राहिल्याचे जाणवले. त्याउलट वैभववाडीत छोट्या छोट्या घडामोडी घडल्याने काहीअंशी निवडणुकीत चुरशीचे चित्र पहायला मिळाले. वैभववाडीतील ज्येष्ठ कार्यकर्ते सज्जनराव रावराणे यांना दिल्या गेलेल्या धमकीनंतर त्याचे पडसाद उमटले. त्या घटनेमुळे वैभववाडीत युती आणि काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. त्याचप्रमाणे विकास आघाडीच्या बिनविरोध नगरसेवकांचे पाठिंबा नाट्य घडले. सकाळी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केलेल्यांनी सायंकाळी घूमजाव केले, तर प्रचार सांगतेच्या पूर्वसंध्येला भाजपच्या प्रमोद रावराणेंनी धमकावल्याचा तक्रार अर्ज काँग्रेसच्या सुनील भोगलेंनी पोलिसांत दिला. या घडामोडीमुळे निवडणुकीचे वातावरण तापले होते. (प्रतिनिधी) उत्सुकता शिगेला... ४दोन्ही नगरपंचायतींच्या प्रचारासाठी युतीचे मंत्री दीपक केसरकर, शिक्षणमंत्री विनोद तावडे, शिवसेना आमदार वैभव नाईक, प्रवक्ते मधू चव्हाण भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार, प्रदेश सरचिटणीस राजन तेली, जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, तर काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे, आमदार नीतेश राणे, जिल्हाध्यक्ष सतीश सावंत या बड्या नेत्यांचे दौरे गेल्या पंधरा दिवसांत वैभववाडी आणि दोडामार्गात झाले. ४ प्रचाराच्या अखेरच्या दिवशी युती आणि काँग्रेसने प्रचार फेऱ्यांद्वारे जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्यामुळे रविवारी मतदान होत असून, दोन्ही नगरपंचायतीच्या निकालाबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे.