ट्विटरवरून दिला होता इशारा : प्रेमविरहामुळे झाला होता निराश
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : प्रेयसीने लग्न करण्यास नकार दिल्याने आत्महत्येच्या पवित्र्यात असलेल्या एका तरुणाला मध्य विभाग सायबर पोलिसांनी तत्परता दाखवीत या कृत्यापासून परावृत्त केले. ट्विटरवर माहिती दिल्यानंतर त्याचा शिताफीने शोध लावत समुपदेशन केले. शनिवारी सकाळी घडलेल्या या प्रकाराबाबत भोईवाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
रिज्जू रत्नाकर (वय ३०) असे त्याचे नाव असून चाकूने शीर कापून घेऊन तो जीवन संपविण्याच्या प्रयत्नात होता. केरळमधील पालकांना बोलाविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
रत्नाकरने डिप्लोमा इन टूल ॲण्ड डिझाइनची पदविका घेतली असून तो पुण्यात एका खासगी कंपनीत काम करीत आहे. सकाळी साडेसहाच्या सुमारास त्याने नैराश्यामुळे आयुष्याचा अंत करीत असल्याचे ट्विट केले होते. पत्रकार गौतम मांगले यांच्या ते निदर्शनास आल्यानंतर त्यांनी ते मुंबई पोलिसांना रिट्विट करीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही कळविले. त्यानंतर तंत्रज्ञानाचा वापर करून त्याचा शोध सुरू केला. सायबर पोलिसांच्या उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी त्याबाबत सूचना दिल्या. ट्विटरवरील मोबाइल नंबरचे लोकेशन मालाड दाखवीत होते.
त्यामुळे मध्य विभाग सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय गोविलकर यांनी तांत्रिक कौशल्य व मित्राच्या मदतीने शोध घेतला असता संबंधित तरुण दादर पूर्व येथील हॉटेल अरोमा येथे रूम नंबर ३१६ मध्ये उतरला असल्याचे समजले. तातडीने ते उपनिरीक्षक नीलेश हेंबाडे यांना सोबत घेत तेथे पोहोचले. मॅनेजरला सांगून बनावट चावीने रूमचा दरवाजा उघडला. त्याला ताब्यात घेत त्याच्या हातातील चाकू काढून घेतला. विश्वासात घेत आत्महत्येपासून मनपरिवर्तन करीत माहिती घेतली. त्याचे सध्या धारावीत राहत असलेल्या मूळच्या तामिळनाडूतील एका २० वर्षांच्या तरुणीसमवेत ३ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघे लग्न करणार होते, परंतु अचानक तिने लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे तो शुक्रवारी तिला भेटण्यासाठी मुंबईला आला, पण तिने भेटण्यास नकार दिला. त्यामुळे नैराश्यामुळे आत्महत्या करण्याचा निर्णय त्याने घेतला होता. मात्र ट्विट केल्यानंतर त्याच्याशी स्टँडअप कॉमेडियन काजोल श्रीनिवासन, मथ्यु अँथनी व पत्रकार गौतम मेडगे यांनी त्याला स्वतः ट्विटरच्या माध्यमातून संभाषण करीत गुंतवून ठेवले होते.