स्नेहा मोरे, मुंबई : ‘एक्स’वर ट्रेंड काय सुरू आहे? विरोधकांच्या बाइटला प्रत्युत्तर दिले का? दिवसभरात व्हॉट्सॲप ग्रुपवर किती सदस्य जोडले गेले? विकासकामांच्या व्हिडीओजचे काम कुठपर्यंत आले?... हा संवाद आहे राजकीय पक्षांच्या वॉर रूममधील. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता या वॉर रूममधील सोशल - डिजिटल युद्धालाही वेग आला आहे. राजकीय पक्षांकडून या निवडणुकीसाठी दक्षिण मुंबईतील मंत्रालयाच्या नजीकच्या परिसरात, नरिमन पाॅइंट, चर्चगेट परिसरात आणि नेत्यांच्या बंगल्यांच्या आवारात अगदी काॅर्पोरेट कार्यालयांचा थाट असणाऱ्या वॉर रूम सुरू करण्यात आल्या आहेत.
काही वर्षांपासून निवडणुकांच्या प्रचाराचे स्वरूप बदलले आहे. २०१४ नंतर डिजिटल प्रचारावर अधिक भर देण्यात येत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, भाजप, शरदचंद्र पवार गट, अजित पवार गट, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, आप अशा पक्षांनी पारंपरिक प्रचाराप्रमाणेच डिजिटल प्रचारासाठी वॉर रूममधून काम सुरू केले आहे. या वॉर रूममध्ये राजकीय रणनीती, फास्ट ट्रॅक निर्णय आणि अल्पावधीत हालचालींसाठी विशेष कक्ष असतो, अशी माहिती सूत्रांनी दिली.
दुसऱ्या स्वरूपाच्या वॉर रूममध्ये प्रसारमाध्यमांमधील हालचालींवर लक्ष ठेवणे, टीका-टिप्पणी करणे, विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर देणे, मीम्स बनवणे, व्हिडीओ, ऑडिओ तयार करणे, व्हाॅट्सॲप ग्रुप, कम्युनिटी चॅनल्स तयार करणे, डिजिटल कॅम्पेनसाठी नव्या कल्पना लढवणे, मतदारांना विकासकामांबाबत दृकश्राव्य स्वरूपात माहिती देणे अशा स्वरूपाचे काम केले जाते. तर, तिसऱ्या स्वरूपाच्या वॉर रूममध्ये केवळ मतदानाच्या दिवशी मतदारांना गोळा करणे, मतदारांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे व मतदारांच्या प्रतिसादावरून विश्लेषण करणे अशा प्रकारची कामे केली जातात, असे प्रमुख राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.
निवडणुकीच्या दृष्टीने वॉर रूमचे काम वेगाने सुरू झाले आहे. आमच्या पक्षाची मुंबईत एका महत्त्वाची वॉर रूम आहे, तसेच काही उमेदवारांच्याही स्वतंत्र वॉररूम असतात. निवडणूक संदर्भातील प्रचार मोहिमा, बैठका, सभा, मतदारांशी कनेक्ट असे वेगवेगळ्या स्वरूपाचे काम येथून केले जाते.- ओमप्रकाश चौहान, प्रवक्ता, माध्यम सहप्रमुख, भाजप
खासगी संस्थांकडेही जबाबदारी -
सोशल मीडियावरील प्रचाराची जबाबदारी काही पक्षांसह उमेदवारांनी खासगी संस्थांकडेही दिली आहे. एकाच वेळी पक्षासह या खासगी संस्थांच्याही वेगळ्या वॉर रूम आहेत. या वॉर रूममध्ये त्यांची व्हिडीओग्राफर, एडिटर, फोटोग्राफर, कंटेट रायटर, स्ट्रेटजिस्ट, ग्राउंड टीम, काॅलिंग टीम, अशी वेगळी टीम असते. या वॉर रूमध्ये मतदारसंघनिहाय वा उमेदवारनिहाय प्रचाराचे काम वेगाने सुरू झाले आहे. त्यांच्याकडे मतदारांच्या संपर्क क्रमांकापासून ते अगदी सोशल मीडिया अकाउंट्सपर्यंत सर्व डेटा संकलित असून, त्याद्वारे अधिकाधिक लोकापर्यंत पोहोचण्यासाठी काम केले जाते.