मुंबई - शाळा , सैराट असे पिक्चर तुम्ही पहिलेच असतील, त्यात जी परिस्थिती दाखवलेय ती आजच्या सध्यपरिस्थितीहून काही जास्त वेगळी नाही. हल्लीच्या पालकांशी होणाऱ्या विसंवादामुळे तसेच मोबाईल, टीव्ही, चित्रपट, इंटरनेट यामुळे शालेय वयातच, अगदी सातवी-आठवीतच विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या प्रेम प्रकरणांचे प्रमाण वाढू लागले आहे. पौगंडावस्थेतील प्रेम प्रकरणांमुळे अभ्यासावर अनिष्ट परिणाम होत असल्याने आता शाळाही याची धास्ती घेऊ लागल्या आहेत. विद्यार्थ्यांना या वयात योग्य मार्गदर्शन नसल्याने शाळांमध्ये समुदेशनाची गरज असल्याचे मत अनेक मुख्याध्यापक व्यक्त करू लागले आहेत.
बदलत्या जगात झपाट्याने बदलणारे नातेसंबंध आणि टीव्ही-सिनेमा-मोबाइल यांमुळे शालेय वयातच विद्यार्थ्यांना मिळणारं अनोखं एक्सपोजर यांमुळे पौगंडवयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींमध्ये अफेअर्स-प्रेमसंबंधांचं प्रमाण वाढत आहे. त्यातून अनेक प्रकारची गुंतागुंत निर्माण होत असून त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होत आहे. मात्र, यामुळे आपल्या शाळेची बदनामी तर होणार नाही ना, या भीतीमुळे या नाजूक विषयावर उघडपणे बोलण्याचं धैर्य शाळा दाखवत नाहीत. मुंबईतील दोन प्रतिष्ठित शाळांमध्ये समुपदेशिक म्हणून कार्यरत असलेल्या मानसोपचारतज्ज्ञ प्राजक्ता भाटकर यांनी सांगितलं की, आठवी-नववीच्या मुला-मुलींमध्ये अफेअर्स होण्याचं प्रमाण गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढले आहे. बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड नसेल तर आपल्यातच काहीतरी उणीव आहे, असा न्यूनगंड त्यांच्यात तयार होतो आणि त्याचा त्यांच्या अभ्यासावर परिणाम होतो. “काही मुलं-मुली आपल्याला आवडता पार्टनर मिळावा, यासाठी चिडवाचिडवीचा अतिरेक करतात. एक वेगळ्याच प्रकारचं ‘बुलिंग’- धकदापटशा हल्ली या विद्यार्थ्यांमध्ये पहायला मिळतंय. या प्रकाराला वैतागून काही विद्यार्थी शाळेत गैरहजर राहतात, मात्र त्यांच्या पालकांना याची कल्पना नसते,” असंही समुपदेशिका प्राजक्ता भाटकर यांनी सांगितले. सायन येथील शिव शिक्षण संस्थेच्या डी. एस. हायस्कूलचे अध्यक्ष राजेंद्र प्रधान यांनी याविषयी सांगितलं की, “पूर्वी आठवी-नववीच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रेमप्रकरणं व्हायची. पण आता सहावी-सातवीच्या विद्यार्थ्यांमध्येही असे प्रकार होताना आढळत आहेत. आम्ही आमच्या शाळेत यासाठी मानसोपचारतज्ज्ञ-समुपदेशकाची नेमणूक केली असून शाळेत गैरहजर राहणारे विद्यार्थी, अभ्यासात मागे पडलेले विद्यार्थी किंवा चिडचिड करणारे विद्यार्थी यांच्याशी हे समुपदेशक नियमितपणे संवाद साधतात, आणि पौगंडवयातील स्वाभाविक नैसर्गिक आकर्षण भावनांना सुयोग्यपणे कसं हाताळावं, याबाबत मार्गदर्शन करतात.” पालकांनी त्यांच्या पौगंडवयीन मुला-मुलींशी अत्यंत मोकळेपणाने संवाद साधणं तसंच त्यांच्या मनातील अफेअर-रोमान्स-रिलेशनशीपबाबतच्या अवास्तव कल्पना दूर करण्यासाठी प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे, असं मतही राजेंद्र प्रधान यांनी व्यक्त केले .