शेफाली परब-पंडित ।
मुंबई : गजबजलेल्या व दाटीवाटीची लोकसंख्या असलेल्या मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे हे महापालिकेपुढे आव्हान होते. त्याहीपेक्षा आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावीमध्ये कोरोनाचा प्रसार मुंबईवरील मोठे संकट ठरले. अडीच चौ.किमी. जागेत वसलेल्या साडेआठ लाख लोकवस्तीमुळे सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा आणि नागरिकांकडून असहकार्य अशा अडचणी पालिकेच्या मोहिमेत बाधा आणत होत्या. मात्र जास्तीत जास्त चाचणी, तात्काळ निदान, चांगले उपचार आणि लवकर डिस्चार्ज या सूत्रांमुळे धारावीतील रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण ४४ दिवसांवर पोहोचले आहे. मिशन धारावीच्या या प्रवासाबाबत जी उत्तर विभागाचे सहायक महापालिका आयुक्त किरण दिघावकर यांच्याशी केलेली बातचीत..
धारावीसारख्या मोठ्या झोपडपट्टीत कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आणणे कसे शक्य झाले?मुंबईत मार्च महिन्यापासून कोरोनाला सुरुवात झाली, पण धारावीत एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाबाधित रुग्ण सापडला. अडीच चौ.मी. जागेत साडेआठ लाख लोकवस्ती असल्यामुळे येथे सोशल डिस्टन्सिंग अशक्य होते. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांची तपासणी करून संशयितांना संस्थात्मक विलगीकरण केंद्रात पाठवणे यावर भर देण्यात आला. मिशन धारावी आणि फिव्हर क्लिनिकच्या माध्यमातून तसेच खासगी डॉक्टर्सच्या मदतीने संपूर्ण विभाग पिंजून काढण्यात आला. आतापर्यंत ८५०० लोकांना संस्थात्मक केंद्रात, तर ३८ हजार लोकांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. तर चार हजार लोकांची चाचणी करण्यात आली आहे. डॉक्टरपासून अभियंत्यापर्यंत पालिकेचे २७५०, तर कंत्राटी १२५० मनुष्यबळ या विभागात काम करीत आहे. रुग्णांपर्यंत तात्काळ पोहोचणे, योग्य उपचार आणि त्वरित डिस्चार्ज हे सूत्र येथे यशस्वी ठरत आहे.या मोहिमेत कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला?या विभागातील दाटीवाटीची लोकवस्ती ही सर्वात मोठी अडचण ठरत होती. येथे सोशल डिस्टन्सिंग शक्य नसल्याने पालिका आणि सरकारी शाळांमध्ये संशयित रुग्णांना ठेवण्यात आले. आतापर्यंत येथील लोकांना २३ लाख जेवणाच्या पाकिटांचा पुरवठा करण्यात आला. तर २५ हजार कुटुंबांना धान्याचे पाकीट पोहोचविण्यात आले. सार्वजनिक शौचालयांचे नियमित निर्जंतुकीकरण, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे औषध देण्यात आले. रमजान काळात येथील मुस्लीम बांधवांची विशेष काळजी घेण्यात आली. रुग्णालयात अथवा कोरोना केंद्रात योगा थेरपी, लाफ्टर थेरपीच्या माध्यमातून सकारात्मक वातावरण निर्माण करण्यात आले. त्यामुळे रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाण वाढले.धारावीत यापुढेही कोरोना वाढणार नाही, यासाठी काय खबरदारीघेतली आहे?लोकांची तपासणी नियमित केली जात आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यावर तात्काळ उपचार देणे शक्य होत आहे. धारावीत रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. तसेच मृत्युदरही सर्वात कमी आहे. त्यामुळे हेच सूत्र पुढे कायम ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर येथील कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.पालिकेच्या आरोग्य केंद्रामार्फत तपासणीचार लाख ७६ हजार घरोघरी जाऊन डॉक्टर्समार्फत तपासणी । ४७ हजार ४०० ज्येष्ठ नागरिक । ८२४६ पालिका दवाखाने । ८७९ मोबाईल व्हॅन द्वारे (खासगी डॉक्टर्स) । १४९७० खासगी क्लिनिकमार्फत । एकूण दोन लाख चाचण्या । एकूण सात हजार नागरिकांची तपासणी । आतापर्यंत रुग्णसंख्या १९८४ । डिस्चार्ज ९९५ । मृत्यू ७५