मोठ्या थकबाकीदारांच्या मालमत्तांची करणार विक्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 06:25 IST2025-04-04T06:25:16+5:302025-04-04T06:25:51+5:30
Mumbai Municipal Corporation: मुंबई महापालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत असलेल्या मालमत्ता कराचे तब्बल २२ हजार कोटी हे मोठे विकासक, प्राधिकरणे व आस्थापना आणि राज्य सरकारचे विविध विभाग यांकडे थकीत आहेत.

मोठ्या थकबाकीदारांच्या मालमत्तांची करणार विक्री
मुंबई - मुंबई महापालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत असलेल्या मालमत्ता कराचे तब्बल २२ हजार कोटी हे मोठे विकासक, प्राधिकरणे व आस्थापना आणि राज्य सरकारचे विविध विभाग यांकडे थकीत आहेत. यातील ५०० मोठ्या थकबाकीदारांची पालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागाकडून यादीही तयार करण्यात आली आहे. वारंवार मुदत देऊनही कर न भरल्याने २४ विभागांतील थकबाकीदारांच्या मालमत्तांचा लिलाव आणि नंतर विक्री करण्याचाच निर्णय पालिकेने घेतला आहे. या मालमत्तांमधील भूखंड व इमारती यांचे सध्याच्या बाजार दराप्रमाणे मूल्यांकन ठरविण्याकरिता शासनमान्यता प्राप्त संस्थेची नियुक्ती पालिका करणार आहे.
३१ मार्चअखेर पालिकेला मागच्या आर्थिक वर्षाचे उद्दिष्ट साध्य करण्यात यश मिळाले आहे. त्यानंतर लगेचच पालिकेच्या कर निर्धारण विभागाने आता मागील अनेक वर्षांपासून मालमत्ता कर थकविलेल्या थकबाकीदारांवर कारवाईचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बड्या थकबाकीदारांच्या मालमत्तेचा लिलाव करण्यात येणार आहे.
म्हाडा मेट्रोचे ५५० कोटी थकीत
मोठ्या थकबाकीदारांमध्ये पालिकेचे विभागही असून, कमला मिल, रघुवंशी मिल अशा मोठ्या आस्थापना आहेत. शिवाय शासकीय विभागांचाही यात समावेश आहे. मुंबई महापालिकेच्या मालमत्ता विभागाच्या काही इमारतींचा मालमत्ता करही थकीत आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशननेही पालिकेचा मालमत्ता कर थकवला आहे. मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने मेट्रो रेल्वे प्रकल्पाची कामे सुरू असून, भूखंडाच्या वापरासंबंधीचे मालमत्ता कर भरण्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित कंत्राटदारांची आहे.
निविदा प्रक्रिया सुरू
पालिकेने लिलाव व विक्री करण्यात येणाऱ्या भूखंड व इमारतींचे मूल्यांकन करण्यासाठी नियुक्त केल्या जाणाऱ्या संस्थेसाठी निविदा मागवल्या आहेत. या संस्थेला पुढील २ वर्षासाठी हे काम दिले जाणार आहे.