खासगी कंत्राटदार करणार मालमत्ता कराची वसुली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2020 12:00 AM2020-03-03T00:00:41+5:302020-03-03T00:00:47+5:30

मालमत्ता कर वसूल करण्याचे काम आता मुंबई महापालिकेऐवजी खासगी कंत्राटदार करणार आहे.

Property contractor will collect property tax | खासगी कंत्राटदार करणार मालमत्ता कराची वसुली

खासगी कंत्राटदार करणार मालमत्ता कराची वसुली

Next

मुंबई : मालमत्ता कर वसूल करण्याचे काम आता मुंबई महापालिकेऐवजी खासगी कंत्राटदार करणार आहे. कारण खासगी कंत्राटदार नेमण्याचा विचार मुंबई महापालिका करत आहे. आणि जर असे झाले तर मालमत्ता करवसुली प्रक्रियेत कितपत पारदर्शकता राहील, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.
लोकसंख्या व लोकसंख्येची घनता याचा विचार करता, आशियातील सर्वात मोठी महापालिका असणाऱ्या मुंबई महापालिकेद्वारे नागरिकांना पाणी, रस्ते, आरोग्य, मलनि:सारण, स्वच्छता यासारख्या सोयी-सुविधा पुरविण्यासाठी असणारी निधीची आवश्यकता ही ज्या विविध स्रोतांमधून भागविली जाते, त्यामध्ये मालमत्ता कर हा एक आपल्या महापालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत आहे. मालमत्ता कराची झालेली अल्प वसुली लक्षात घेता यंदा अचल संपत्तीसोबतच चल संपत्तीवर जप्तीची कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता दुचाकी, चारचाकी, घरातील फर्निचर, टीव्ही, फ्रीज या वस्तूंवरदेखील कारवाई केली जात आहे.
>एवढे आहेत मालमत्ताधारक
महापालिका क्षेत्रात सुमारे ४ लाख ५० हजार मालमत्ताधारक आहेत. यामध्ये १ लाख २७ हजारांपेक्षा अधिक निवासी, ६७ हजारांपेक्षा अधिक व्यावसायिक, औद्योगिक स्वरूपाच्या ६ हजारांपेक्षा अधिक, १२ हजार १५६ भूभाग आणि इतर प्रकारच्या मालमत्तांचा समावेश आहे.
>आधी दिली दवंडी
मालमत्ता कर थकबाकीसाठी वेगळी शक्कल लढवली जात आहे. आधी मुंबई पालिकेने दवंडी दिली. नंतर व्यावसायिक थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई सुरू केली. मात्र आता खासगी कंत्राटदार नेमण्याचा पालिकेचा विचार आहे.
>चालू आर्थिक वर्षात ५ हजार ५०० कोटी रुपये वसुली मालमत्ता करापोटी होणे अपेक्षित होते. मात्र, फेब्रुवारी अखेरपर्यंत केवळ ३ हजार १५४ कोटी एवढीच मालमत्ता कराची वसुली झाली. २०१६-१७ आणि २०१७-१८ मध्ये ५ हजार ४०० कोटी रुपये मालमत्ता करापोटी जमा करण्याचे लक्ष्य निर्धारित होते. दोन्ही वर्षांत अनुक्रमे ४ हजार ८४७ कोटी आणि ५ हजार १३२ कोटी रुपये जमा करण्यात आले.
२०१८-१९ मध्ये ५ हजार ४३९ कोटी एवढे लक्ष्य होते, ज्यापैकी ५ हजार ४० कोटी वसुली झाली.
२०१९-२० मध्ये ५ हजार ५०० कोटी लक्ष्य ठरविण्यात आले, ज्यापैकी २४ फेब्रुवारीपर्यंत ३ हजार १५४ कोटी रुपयांचा भरणा झाला.
>यंदाची मालमत्ता करवसुली ही लक्ष्यापेक्षा मागे आहे. जी गेल्या काही वर्षांच्या तुलनेत लक्षणीय प्रमाणात कमी आहे. परिणामी आर्थिक वर्ष संपण्यास केवळ एका महिन्याचा कालावधी शिल्लक असल्याने दररोज किमान ८० कोटींची मालमत्ता करवसुली करण्याचे लक्ष्य आता आहे.
>खासगी कंत्राटदारास विरोधच
महापालिका मालमत्ता कर वसूल करण्यासाठी खासगी कंत्राटदाराचा विचार करत असेल तर ते चुकीचे आहे. जे करायचे आहे; ते पालिकेने केले पाहिजे. कारण हा महसूल मुंबई महापालिकेचा महसूल आहे. हा महसूल कोणत्या खासगी संस्थेला गेला नाही पाहिजे. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये हा प्रस्ताव आल्यानंतर आम्ही त्यास विरोध करणारच आहोत.
- रवी राजा, विरोधी पक्षनेता, मुंबई महापालिका

Web Title: Property contractor will collect property tax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.