राज्यात सरासरी किंमत ३८ लाख : मुंबईत १ कोटी ३४ लाख रुपये
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुद्रांक शुल्कातील कपात आणि विकासकांच्या सवलतींमुळे मुंबईच नव्हे तर राज्यातील मालमत्तांचे खरेदी-विक्री व्यवहार सध्या तेजीत आहेत. मुंबईत गेल्या वर्षीच्या तुलनेत ६० टक्के जास्त व्यवहार होत असतानाच राज्यातील वृद्धीचा आकडा हा जवळपास ३५ टक्के आहे. विशेष म्हणजे मुंबईतील मालमत्तांची सरासरी किंमत १ कोटी ६९ लाख रुपये असून महाराष्ट्रात ती किंमत जवळपास ३८ लाख रुपयांच्या आसपास असल्याची माहिती हाती आली आहे.
राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात कपात केल्यानंतर राज्यात (मुंबई वगळता) सप्टेंबर ते नोव्हेंबर या तीन महिन्यांत अनुक्रमे १ लाख १९ हजार, १ लाख ३० हजार आणि १ लाख ३७ हजार मालमत्तांची नोंदणी झाली. विशेष म्हणजे डिसेंबर महिन्यातील पहिल्या १५ दिवसांतच ९७ हजार मालमत्तांची नोंदणी झाली. पुढील पंधरा दिवसांत ती संख्या १ लाख ७५ हजारांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. आजवर एका महिन्यात झालेले हे सर्वाधिक व्यवहार ठरण्याची चिन्हे आहेत.
राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात तीन टक्के कपात केल्यामुळे सरकारी तिजोरीत अनुक्रमे ७७३, ९३१, १०२६ आणि ७४१ कोटी रुपये जमा झाले. या आकडेवारीनुसार राज्यातील मालमत्तांची सरासरी किंमत काढल्यास ती ३८ लाख रुपये होते.
* किमती गगनाला भिडणाऱ्या
मुंबई शहरातही गेल्या ९ वर्षांतील सर्वाधिक घरांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार नोव्हेंबर महिन्यात झाले. या घरांच्या खरेदी-विक्रीतून नोव्हेंबर महिन्यात २८८ कोटी रुपये जमा झाले होते. त्याचा ताळेबंद मांडल्यास मुंबईतील मालमत्तांची सरासरी किंमत १ कोटी ६९ लाख रुपये होते. मुंबईतील मालमत्तांच्या किमती गगनाला भिडणाऱ्या असल्याचे त्यातून निष्पन्न होत आहे.
..................