मुंबई : मालमत्ता कराची थकबाकी असणाऱ्यांकडून कराची वसुली करण्यासाठी पालिका हरतऱ्हेने प्रयत्न करत असली तरी टॉप-१० थकबाकीदारांच्या यादीचे शेपूट वाढतच चालले आहे. गेले १५ दिवस करनिर्धारण आणि संकलन खाते रोज टॉप-१० थकबाकीदारांची यादी जाहीर करत आहे. मात्र, अजूनही अशा थकबाकीदारांची संख्या कमी झालेली नाही.
टॉप-१० थकबाकीदारांमध्ये बडे व्यावसायिक, गृहनिर्माण क्षेत्रातील मंडळी, व्यापारी, गृहनिर्माण सोसायट्या आहेत. शिवाय काही खासगी व्यक्तीही आहेत. गेल्या १५ दिवसांपासून पालिका रोज १० थकबाकीदारांची यादी प्रसिद्ध करीत आहे. मात्र, अजूनही यात अनेकांचा समवेश असल्याचे दिसते. या सगळ्यांना पालिकेच्या विभाग कार्यालयाच्या स्तरावर नोटिसा पाठवण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत १५० बड्या थकबाकीदारांची नावे झळकली आहेत. गेल्या काही दिवसांत यादीत गृहनिर्माण क्षेत्रातील बिल्डरांच्या आणि त्यांच्या कंपन्यांच्या नावांचे प्रमाण वाढले आहे.
करभरणा करून दंडाची कारवाई टाळा-
१) निर्धारित कालावधीमध्ये मालमत्ता कर न भरणाऱ्या मालमत्ताधारकांवर महापालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्याकडून लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
२) सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी २५ मे २०२४ हा मालमत्ता कर भरणा करण्याचा अंतिम दिवस आहे. त्यामुळे मालमत्ताधारकांनी मुदतीपूर्वी करभरणा करून संभाव्य दंडाची कारवाई टाळावी, असे आवाहन करण्यात आले आहे.