मालमत्ता कर डेबिट, क्रेडिट कार्ड, पेमेंट वॉलेटद्वारे भरणे शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:11 AM2021-09-09T04:11:03+5:302021-09-09T04:11:03+5:30
मुंबई - मालमत्ता करात यंदा वाढ करण्यात येणार नसल्याने पालिकेच्या उत्पन्नात अपेक्षित वाढ दिसून येणार नाही. त्यामुळे जास्तीत जास्त ...
मुंबई - मालमत्ता करात यंदा वाढ करण्यात येणार नसल्याने पालिकेच्या उत्पन्नात अपेक्षित वाढ दिसून येणार नाही. त्यामुळे जास्तीत जास्त थकबाकी वसूल करण्यासाठी पालिका प्रशासनाने नेट बँकिंगसह आता डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय, पेमेंट वॉलेट हेही पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.
महापालिकेच्या https://ptaxportal.mcgm.gov.in/CitizenPortal/ या संकेतस्थळावर मालमत्ता कराची देयके उपलब्ध आहेत. त्यांचे अधिदान या संकेतस्थळावर तसेच महापालिकेच्या मोबाईल ॲपद्वारेही करता येणे शक्य आहे. कर भरण्यासाठी महापालिका संकेतस्थळावर पेमेंट गेटवे पद्धतीने देयक भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. यामध्ये बँक ऑफ बडोदा यांच्या पेमेंट गेटवे माध्यमातून विनाशुल्क देयके भरता येतील. त्यात नेट बँकिंग, यूपीआय, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, पेमेंट वॉलेट या पर्यायांचा देखील अवलंब करता येणार आहे.
माय बीएमसी ॲप
सिटी बँकेच्या पेमेंट गेटवे माध्यमातून प्रति वापर २० रुपये शुल्क आकारून देयके भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. यामध्ये नेट बँकिंग हा एकच पर्याय उपलब्ध आहे. अँड्रॉइड, आयओएस आधारित ‘माय बीएमसी24 x 7’ हे मोबाईल ॲप डाऊनलोड करून त्याद्वारे नागरिकांना मालमत्ता कराचे अधिदान करता येते. त्यात नेट बँकिंगसह यूपीआय, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, पेमेंट वॉलेट या पर्यायांचा देखील विनाशुल्क अवलंब करता येईल.