मालमत्ता करवसुलीचे लक्ष्य यंदा चुकणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 05:06 AM2019-01-25T05:06:21+5:302019-01-25T05:06:29+5:30

आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाची जबाबदारी घेण्यास महापालिका उत्सुक नाही.

Property tax collection target this year? | मालमत्ता करवसुलीचे लक्ष्य यंदा चुकणार?

मालमत्ता करवसुलीचे लक्ष्य यंदा चुकणार?

Next

मुंबई : आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाची जबाबदारी घेण्यास महापालिका उत्सुक नाही. मात्र या प्रकरणात उच्च न्यायालयाने मध्यस्थी नेमल्यामुळे भविष्यात महापालिकेला बेस्टसाठीही आर्थिक तजवीज करावी लागणार आहे. मात्र आर्थिक कणा असलेला जकात कर रद्द झाल्यामुळे मालमत्ता कर हेच उत्पनाचे प्रमुख स्रोत ठरले आहे. त्यामुळे मालमत्ता कराचे लक्ष्य गाठण्यासाठी महापालिकेने थकबाकीदारांकडे मोर्चा वळवला आहे. अशा शंभर थकबाकीदारांची यादी कर निर्धारण व संकलन विभागाने तयार केली आहे. या थकबाकीदारांकडून तब्बल ७०५ कोटी रुपये थकीत कर वसूल करण्यात येणार आहे.
जकात करातून मुंबई महापालिकेला दरवर्षी तब्बल साडेसात हजार कोटी रुपये महसूल मिळत होता. मात्र १ जुलै २०१७ रोजी वस्तू व सेवा कर लागू झाला. या नुकसानभरपाईपोटी महापालिकेला शासकीय अनुदान मिळत आहे. परंतु, भविष्याची तजवीज म्हणून उत्पन्नाचे भक्कम स्रोत विकसित करण्याचे महापालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. मालमत्ता कराच्या माध्यमातून सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात ५४०० कोटी रुपये वसूल करण्याचे महापालिकेचे लक्ष्य होते. मात्र डिसेंबर २०१८ पर्यंत ३०३१ कोटी रुपयेच पालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत. याचा फटका आगामी वर्षात हाती घेण्यात येणाऱ्या पायाभूत प्रकल्पांना बसू शकतो.
त्यामुळे अडीच हजार कोटी रुपये वसूल करण्यासाठी महापालिकेने थकबाकीदारांची यादी तयार केली आहे. थकबाकीदारांना नोटीस पाठवून थकीत रक्कम भरण्याची मुदत देण्यात येणार आहे. त्यानंतरही संबंधित कंपनी अथवा व्यक्तीने थकीत मालमत्ता कर महापालिकेकडे जमा न केल्यास त्यांचा पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. दरम्यान, थकबाकीदारांना रक्कम भरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजनाही दरवर्षी जाहीर करण्यात येते. त्यानुसार जूनपूर्वी थकीत रक्कम भरल्यास चार टक्के तर जुलैपूर्वी भरल्यास करामध्ये तीन टक्के सवलत देण्यात येते.
>असे आहे वसुलीचे लक्ष्य
सन २०१७-१८ - ५४०० हजार
कोटींचे लक्ष्य
>मालमत्ता कर वसूल
एप्रिल ते डिसेंबर २०१८ - ३०३१ कोटी
एप्रिल ते डिसेंबर २०१७ - ३०६१ कोटी
जानेवारी ते मार्च २०१८ - १७०० कोटी
>हे आहेत थकबाकीदार (मार्च २०१९ पर्यंत)
रघुवंशी मिल - ६७ कोटी
स्टेरलिंग इन्व्हेस्टमेंट कॉर्पाेरेशन - २१.९ कोटी
वाधवा ट्रेड सेंटर - २०.३ कोटी
ओमकार डेव्हलपर - १९ कोटी
मँकनिल अ‍ॅण्ड बेरी - १८.५५ कोटी
म्हाडा एचडीआयएल - १८.५१ कोटी
अमीर पाकॅ अ‍ॅण्ड अम्युझमेंट - १७.३ कोटी
आशापुरा डेव्हलपर्स - १७.१ कोटी
सोफीटेल - १५.९ कोटी
एमएमआरडीए लोढा क्राऊन बिल्डमार्ट - १५.६ कोटी

Web Title: Property tax collection target this year?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.