मुंबई : उत्पन्नाचे प्रमुख स्रोत असलेल्या मालमत्ता कराचे लक्ष्य गाठण्यासाठी महापालिकेने मोहीम तीव्र केली. त्यामुळे आतापर्यंत चार हजार ५३६ कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत, तर सहाशे कोटी रुपयांची तूट आहे. थकबाकीदारांची जलजोडणी, जप्ती अशी कारवाई करण्यात येत होती. मात्र, करनिर्धारण व संकलन विभागाने आता मलनि:सारण वाहिनी खंडित करण्याची कारवाई सुरू केली आहे. सन २०२०-२०२१ या आर्थिक वर्षात ५२०० कोटी रुपयांचे लक्ष्य महापालिकेने ठेवले होते. मात्र, फेब्रुवारीपर्यंत दोन हजारांहून अधिक रक्कम थकीत असल्याने करनिर्धारण खात्याने थकबाकीदारांना नोटीस पाठविण्यास सुरुवात केली. त्यानुसार गेल्या महिन्याभरात मोठी वसुली थकबाकीदारांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या सहाशे कोटी रुपयांची तूट आहे. वारंवार विनंती करून व नोटीस पाठवूनही कर न भरणाऱ्या मालमत्ताधारकांच्या जलजोडणी खंडित करणे, महागड्या वस्तू जप्त करणे अशी कारवाई करण्यात येत आहे. याचबरोबर आता मलनि:सारण वाहिनीही खंडित करण्यात येत आहे. या कठाेर कारवाईमुळे आता कर वसुलीस मदत मिळत आहे. तसेच मुदतीत मालमत्ता कर न भरल्यास मालमत्ता कराच्या थकीत रकमेवर दंड आकारण्यात येत आहे. अशा काही कारवाया... अंधेरी हॉटेल झिलीओनची आठ कोटी ७० लाख ५८ हजार ७३८ थकबाकी असल्याने मलनि:सारण वाहिनी खंडित केली. झवेरी कन्स्ट्रक्शन प्रा. लि. यांच्या एका मालमत्तेवर ६५ लाख ३९ हजार रुपयांची थकबाकी. कार्यालयातील सामान जप्त करण्यात आले, तर राज चेंबर या इमारतीवर दोन कोटी ८० लाख ६५ हजार थकबाकी. त्यांची मलनि:सारण वाहिनी खंडित केली. वांद्रे (पूर्व), शक्ती सदन इमारतीच्या बी विंगमधील एका कार्यालयावर मालमत्ता कराची ९४ लाखांची थकबाकी असल्याने कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले. अंधेरीतील त्रिशूळ सहकारी गृहनिर्माण संस्थेवर ६४ लाख ४९ हजार रुपये थकबाकी. त्या ठिकाणी असणारे एक यंत्र जप्त करून अटकावणीची कारवाई.nसाई समर्थ सोसायटी या मालमत्तेवर दोन कोटी ६८ लाख रुपये थकबाकी. nभास्कर बी. सैनल यांच्या अखत्यारीतील व्यवसायिक मालमत्तेवर २९ लाख ७५ हजार रुपये थकबाकी. कार्यालयीन साहित्य ताब्यात घेतले. मुंबई महापालिकेने सन २०२०-२०२१ या आर्थिक वर्षात ५२०० कोटी रुपयांचे लक्ष्य ठेवले होते. ते पूर्ण करण्यासाठी उपाययाेजना हाती घेतल्याने व कृतीवर भर दिल्याने आता केवळ सहाशे काेटी रूपयांची तूट असल्याचे समाेर आले आहे.
मालमत्ता कराची तूट सहाशे कोटींची, थकबाकीदारांच्या जलजोडणीसह मलनिस्सारण वाहिनीही खंडित
By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2021 8:28 AM