मुंबई :मुंबई महापालिकेने मालमत्ता कर भरण्यासाठी नागरिकांना २५ मेपर्यंत मुदत दिली आहे. त्यानंतर कर न भरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात संबंधित व्यावसायिकांच्या कार्यालयातील, कारखान्यातील सामान जप्त करण्यात येईल. तर दुसन्या टप्प्यात त्या सामानाचा लिलाव करण्यात येईल. मालमत्ता कराच्या बिलापैकी ५० टक्के रक्कम भरल्यास कारवाईतून सुटका होणार आहे. पालिकेला अजूनही मालमत्ता करवसुलीचे निर्धारित लक्ष गाठता आलेले नाही. त्यामुळे करवसुलीसाठी पालिकेचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
मात्र, अनेक बड्या थकबाकीदारांनी, व्यावसायिक आस्थापनांनी, गृहनिर्माण क्षेत्रातील विकसकांनी मोठ्या प्रमाणावर मालमत्ता कर थकवला आहे. या मंडळींकडे जवळपास दीड हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यांनी कराचा भरणा करावा, यासाठी पालिका रोज टॉप-१० थकबाकीदारांची यादी प्रसिद्ध करत आहे. मात्र, त्यानंतरही फारच कमी जणांनी कर भरला आहे.
थकबाकीदारांकडून करवसुली झाल्यास मालमत्ता करवसुलीचे लक्ष गाठण्यात पालिकेला मोठा हातभार लागेल. परंतु, तसे होताना दिसत नाही.
दुसऱ्या टप्प्यात लिलाव-
नागरिकांना कर भरण्याची अंतिम मुदत २५ मे आहे. त्यानंतरच्या कारवाईसाठी पालिकेने तयारी सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात व्यावसायिकांच्या कार्यालयातील, कारखान्यातील फर्निचर, यंत्रसामग्री, संगणक आणि अन्य वस्तू जप्त करून त्या पालिकेच्या गोदामात ठेवल्या जातील. त्यानंतर कर भरण्यासाठी मुदत दिली जाईल, त्यानंतरही कर भरला नाही, तर मात्र जप्त मालाचा लिलाव केला जाईल.
सुधारित नियमावलीचे काम सुरू-
मालमत्ता कर आकारणीबाबत सुधारित नियमावली करण्याचे काम सुरू आहे. हे अत्यंत किचकट काम असल्याने त्यास वेळ लागणार आहे. मात्र, जुन्या नियमावलीच्या आधारे व्यावसायिक ५० टक्के रक्कम भरू शकतात. २०१४ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने तसा अंतरिम आदेश दिला आहे. याचा अर्थ व्यावसायिकांना अर्धी रक्कम भरण्याची संधी आहे, असे प्रशासनाने सांगितले.