मालमत्ता करात आता ‘बेस्ट’ भार
By Admin | Published: June 30, 2015 01:25 AM2015-06-30T01:25:15+5:302015-06-30T01:25:15+5:30
दोन भाडेवाढीनंतरही आर्थिक तोट्यात असलेल्या बेस्टने मुंबईकरांना आज आणखी एक दणका दिला आहे़ मालमत्ता करात परिवहन उपकर लागू करण्याचा प्रस्ताव तातडीचे कामकाज
मुंबई : दोन भाडेवाढीनंतरही आर्थिक तोट्यात असलेल्या बेस्टने मुंबईकरांना आज आणखी एक दणका दिला आहे़ मालमत्ता करात परिवहन उपकर लागू करण्याचा प्रस्ताव तातडीचे कामकाज म्हणून पालिका महासभेच्या पटलावर आणण्यात आले आणि विरोधकांना न जुमानत शिवसेना-भाजपा युतीने ही नवीन करवाढ मंजूर करीत मुंबईकरांना धक्का दिला आहे. बेस्ट उपक्रमाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी फेब्रुवारी आणि एप्रिल महिन्यात दोन भाडेवाढ करण्यात आल्या़ मात्र यातूनही बेस्टचा आर्थिक तोटा भरून निघणारा नाही़ त्यामुळे मालमत्ता करामधून परिवहन उपकर लावण्याची शिफारस बेस्ट प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी केली़ त्यानुसार राज्य सरकारने कायदा करून उपकर लागू करण्यास अनुमती दिली़ बेस्टनेही याबाबत नियमावली तयार करून बेस्ट समितीच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव पालिका महासभेकडे पाठविला होता़
मात्र ही वाढ अन्यायकारक असल्याने हा प्रस्ताव दफ्तरी दाखल करावा, अशी उपसूचना विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी मांडली़ आर्थिक तूट भरून काढण्यासाठी भाजपा सरकारकडे अनुदान मागण्याचा सल्लाही त्यांनी दिला़ मात्र युतीने ही उपसूचना फेटाळून लावत बहुमताच्या जोरावर परिवहन उपकर लागू करण्याचा प्रस्ताव मंजूर केला़ (प्रतिनिधी)
-१ फेब्रुवारी रोजी बेस्ट उपक्रमाने भाडेवाढ केल्यानंतर महिन्याभरातच प्रवासी संख्या दोन लाखांनी घटली़ त्यानंतरही पुन्हा १ एप्रिलपासून दुसरी भाडेवाढ करण्यात आली़ भाडेवाढीमुळे किमान प्रवासी भाडे आठ रुपये झाले आहे़ त्यामुळे अनेक प्रवाशांनी शेअर रिक्षाकडे धाव घेतली आहे़
-ही वाढ मंजूर झाल्यामुळे करदात्यांना एकूण कराच्या आठ टक्के परिवहन उपकर आकारण्यात येणार आहे़ एप्रिल२०१६ पासून ही वाढ होणे अपेक्षित आहे़ हा प्रस्ताव आता मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे़
-मालमत्ता करामध्ये परिवहन उपकर लागू केल्यानंतर बेस्टला वार्षिक ४८० कोटींचा नफा होईल़ हा उपकर करदात्यांच्या एकूण मालमत्ता कराच्या दहा टक्के असणार आहे़