Join us

हिसका दाखवताच भरला ४९ लाखांचा मालमत्ता कर; चार मालमत्तांवर महापालिकेची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2024 10:16 AM

सातत्याने आवाहन करत आणि पाठपुरावा करूनही मालमत्ता करभरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या चार मालमत्ताधारकांवर पालिकेने कारवाई केली.

मुंबई : सातत्याने आवाहन करत आणि पाठपुरावा करूनही मालमत्ता करभरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या चार मालमत्ताधारकांवर पालिकेने कारवाई केली. या मालमत्तांमध्ये ‘जी उत्तर’ विभागातील तीन भूखंड आणि ‘पी उत्तर’ विभागातील एका व्यावसायिक गाळ्याचा समावेश आहे. या चारही मालमत्ताधारकांकडे एकूण १० कोटी १३ लाख २२ हजार ९१२ हजार रुपयांची कर थकबाकी आहे. कारवाईची प्रक्रिया सुरू करताच एका गाळाधारकाने ४९ लाख रुपयांचा तत्काळ मालमत्ता करभरणा केला.

पालिकेकडून सोमवारी ‘जी उत्तर’ विभागात जसोदा गृहनिर्माण संस्था (०३ कोटी ३७ लाख ५३ हजार ९१७ रुपये), संदीप इस्टेट डेव्हलपमेंट प्रा. लि. (०३ कोटी ५८ लाख ३२ हजार १६६ रुपये), त्रिधातू कन्स्ट्रक्शन प्रा. लि. (०१ कोटी ९४ लाख ३६ हजार ८२९ रुपये) यांच्यावर कारवाई करण्यात आली. 

तर, मंगळवारी ‘पी उत्तर’ विभागातील पठाणवाडी येथील  हबीब नूर मोहम्मद यांच्या व्यावसायिक गाळ्यावर  कारवाई करण्यात आली. हबीब नूर मोहम्मद यांच्याकडे एकूण १ कोटी २३ लाख रुपये मालमत्ता कर थकीत आहे. कारवाई सुरू होताच त्यांनी यापैकी ४९ लाख रुपयांचा तत्काळ करभरणा केला.  कारवाई झालेल्या मालमत्ताधारकांनी पुढील पाच दिवसांच्या आत करभरणा न केल्यास जप्त केलेल्या मालमत्तेची लिलावाद्वारे विक्री करण्यात येईल.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाकर