मालमत्ता कराची देयके आता ई-मेलद्वारे मिळणार, करदात्यांना भरावा लागणार KYC फॉर्म
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2021 03:08 PM2021-01-20T15:08:27+5:302021-01-20T15:09:14+5:30
मुंबईत मोठ्या प्रमाणात करदात्यांनी केवायसीची नोंद अद्याप केलेली नाही. केवायसी अद्ययावत केल्यानंतर मालमत्ता करासंबंधीची सूचना ई-मेल आणि एसएमएसद्वारे करदात्यांना पाठवण्यात येणार आहे.
मुंबई - उत्पन्नाचे स्त्रोत असलेल्या मालमत्ता कराच्या वसुलीसाठी महापालिकेकडे अवघे दोन महिने उरले आहेत. त्यामुळे मालमत्ता कराची देयके लवकरात लवकर पोहोचण्यासाठी आता ई-मेलवर पाठविण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी करदात्यांनी पालिकेच्या https://ptaxportal.mcgm.gov.in/CitizenPortal/ या संकेतस्थळावर जाऊन केवायसी फॉर्ममध्ये आपली आवश्यक माहिती अद्ययावत करावी, असे आवाहन पालिकेने केले आहे.
मुंबईत मोठ्या प्रमाणात करदात्यांनी केवायसीची नोंद अद्याप केलेली नाही. केवायसी अद्ययावत केल्यानंतर मालमत्ता करासंबंधीची सूचना ई-मेल आणि एसएमएसद्वारे करदात्यांना पाठवण्यात येणार आहे. या सुविधेमुळे पालिका प्रशासन आणि करदाता या दोघांनाही मोठा फायदा होणार आहे. नागरिकांना मालमत्ता कर देयके वेळेत प्राप्त होतील. यामुळे वेळेवर कराचा भरणा होऊन दंडाची कारवाई टाळता येईल. तर पालिकेला वेळेत कर मिळू शकणार आहे. तसेच ई-मेल आणि एसएमएसमुळे भविष्यातील मालमत्ता कराविषयक योजनेची माहिती नागरिकांना मिळणार आहे. करदात्यांच्या मालमत्तेत झालेल्या दुरुस्तीमुळे सुधारित देयके त्वरित उपलब्ध होतील. पालिकेच्या देयकांसाठी वापरात असलेल्या कागदाचा व त्यावरील पोस्टेज, पाकिटे, फ्रॅकिंग या बाबींचा खर्च टाळता येईल. वेळ व पैसा या दोन्हींबाबत करदात्यांसह पालिकेचीही बचत होईल, असा दावा प्रशासनाने केला आहे.
मुंबईत सुमारे सव्वा चार लाख मालमत्ता करदाते आहेत. त्यापैकी सव्वा लाख करदात्यांनी केवायसीची नोंदणी केली आहे.
सन २०२० -२०२१ आर्थिक वर्षात पाच हजार ३०० कोटींपैकी केवळ ९५० कोटी आतापर्यंत जमा झाले आहेत. तर डिसेंबर २०२० पर्यंत एकूण १९ हजार ५०० कोटी रुपये थकीत आहेत.