लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : प्रॉपर्टी टॅक्स जास्त आल्याच्या किरकोळ वादातून, पत्नीची हत्या करण्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी वाकोल्यात घडला. या प्रकरणी पोलिसांनी तिच्या पतीला अटक केली असून, अधिक चौकशी सुरू आहे.सांताक्रुझ पूर्वच्या सुंदरनगर परिसरात सेलिन वायलेट (५७) या त्यांचे पती रॉक डिसोझा (६५) यांच्यासोबत गेल्या ३५ वर्षांपासून राहत होत्या. रॉक हे एका खासगी कंपनीत कामाला असून, सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांना मूलबाळ नसून, ते राहत असलेल्या बंगल्यात त्यांनी दोन भाडोत्री ठेवले आहेत. यातील एक इस्त्रीवाला, तर दुसरा किराणा जनरल स्टोअर्सचा मालक आहे. वाकोला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव व्हावळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पतिपत्नीमध्ये लहानसहान गोष्टींवरून नेहमी वाद व्हायचे. सोमवारी रात्रीदेखील प्रॉपर्टी टॅक्स जास्त आल्यावरून त्यांच्यात भांडण झाले. रागाच्या भरात रॉकने सेलिनचा गळा दाबून त्यांची हत्या केली. त्यानंतर, दोन भाडोत्रींपैकी इस्त्रीवाल्याला बोलावून ‘मी सेलिनला ठार मारले,’ असे सांगितले. या इस्त्रीवाल्याने याबाबत त्यांच्या नातेवाइकांना कळविल्यानंतर ही घटना उघडकीस आली.६ जुलैपर्यंत पोलीस कोठडीरॉक यांनी स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन करून गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांना अटक करून मंगळवारी स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याचे व्हावळे यांनी सांगितले.
प्रॉपर्टी टॅक्स जास्त आल्याने पत्नीची हत्या!
By admin | Published: July 05, 2017 5:22 AM