Join us

मुंबईतील २३४ हॉटेल्सचा मालमत्ता कर माफ करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान आंतरराष्ट्रीय प्रवासी व अतिजोखमीच्या गटातील व्यक्तींसाठी विलगीकरण सुविधा उपलब्ध करणाऱ्या २३४ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान आंतरराष्ट्रीय प्रवासी व अतिजोखमीच्या गटातील व्यक्तींसाठी विलगीकरण सुविधा उपलब्ध करणाऱ्या २३४ हॉटेल्सचा मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार फेब्रुवारी ते मे या कालावधीतील ४१ कोटी नऊ लाख रुपये मालमत्ता कर माफ करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

मार्च २०२० पासून मुंबईत कोरोनाचा प्रसार सुरू झाला. त्या वेळेस परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना १४ दिवसांसाठी पंचतारांकित हॉटेलमध्ये राहणे बंधनकारक करण्यात आले होते. तसेच कोविडबाधित रुग्णांच्या संपर्कातील अति जोखमीच्या व्यक्ती, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व आरोग्य कर्मचारी या कोविड योद्ध्यांच्या राहण्याची सोय हॉटेलमध्ये करण्यात आली होती.

यासाठी एप्रिल ते जून २०२० या कालावधीत विलगीकरण सुविधा उपलब्ध करणाऱ्या १८२ हॉटेलचा २२ कोटी मालमत्ता कर माफ करण्यात आला होता. या प्रस्तावावरून विरोधी पक्षांकडून पालिका प्रशासनावर टीकेची झोड उठली होती. त्यामुळे पुन्हा करमाफीचा नवीन प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर चर्चेसाठी आल्यास त्यास विरोध होण्याची शक्यता आहे.

चौकट

आरोग्य खात्याचा निधी वळवणार

हॉटेलचा मालमत्ता कर माफ करण्यात येत असला तरी पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत हा निधी मालमत्ता कर विभागाकडे वळती करण्यात येत असतो. गेल्या वर्षी या प्रस्तावाला काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी आणि भाजप पक्षाने विरोध दर्शविला होता. या वेळेस पुन्हा आरोग्य खात्यातून निधी वळवला जाण्याची शक्यता आहे.