घरपट्टी वाढणार : खेड्यांमध्येही होणार घर, जमिनींची हक्कनोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 07:06 AM2018-12-27T07:06:39+5:302018-12-27T07:06:53+5:30
राज्यात ग्रामीण भागातील घरे आणि भूखंडांचे रेकॉर्ड अद्ययावत करून आखीव पत्रिका तयार करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.
- यदु जोशी
मुंबई : राज्यात ग्रामीण भागातील घरे आणि भूखंडांचे रेकॉर्ड अद्ययावत करून आखीव पत्रिका तयार करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे पहिल्यांदाच लाखो लोकांच्या जमिनींची हक्क नोंद (रेकॉर्ड आॅफ राईट्स) तयार होणार आहे. असे असले तरी या निमित्ताने ग्रामपंचायतींचे उत्पन्न वाढेल पण दुसरीकडे खेड्यांमधील घरमालकांवर वाढीव घरपट्टीचा बोजा पडण्याची शक्यता आहे.
राज्यातील ४४ हजार गावांपैकी ३५ हजारपेक्षा अधिक गावांमध्ये घरपट्टी भरण्यासाठी म्हणून घरे, जमिनींची नमूना ८ वर (आखीव पत्रिका) नोंद असते. त्या आधारे ग्रामपंचायती घरपट्टीची आकारणी करतात. मात्र, न्यायालय व अन्यत्र त्या जागेची मालकी सिद्ध होण्यासाठी ‘रेकॉर्ड आॅफ राईट्स’ म्हणून ते ग्राह्य धरले जात नाही. त्यामुळे अनेकदा न्यायालयामध्ये मालकी सिद्ध करण्यात अडचणी येतात किंवा जागेचा शेजारच्याशी वा अन्य कोणाशी वाद असेल तर त्या परिस्थितीत कुणाची किती जागा आहे, हे नेमके सिद्ध होत नाही.
आता पुणे येथील भूमि अभिलेख विभागाच्या मदतीने राज्याच्या सर्व गावठाणांमधील जागांचे निश्चितीकरण होईल. ग्रामपंचायतीतील कर्मचारी जागांची मोजणी करून त्यावर आतापर्यंत घरपट्टी लावायचे. त्यामुळे वर्षानुवर्षे अनेक जागांची मोजणी आहे त्यापेक्षा कमी कमी दाखविण्यात आली. आता नव्या निश्चितीकरणामुळे नेमक्या क्षेत्रफळाची नोंद होईल आणि त्या आधारे घरपट्टी निश्चित केली जाणार आहे. ग्रामविकास विभागाने प्रस्ताव तयार केला असून लवकरच तो राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी येणार आहे. शहरांमध्ये जागांच्या आखीव पत्रिका दिल्या जातात तशा आता ग्रामीण भागातही देण्यात येणार आहेत.