मराठा आरक्षण: हिंसक आंदोलनात १२ कोटींचे नुकसान, कायदा हातात घेऊ नका अन्यथा...
By मनीषा म्हात्रे | Published: November 1, 2023 07:31 PM2023-11-01T19:31:11+5:302023-11-01T20:25:10+5:30
राज्यभरात १६८ जणांना अटक, हिंसक आंदोलनात तोडफोड आणि जाळपोळीमुळे राज्यात १२ कोटी रुपयांच्या सरकारी मालमत्तेचे नुकसान झाले आहे.
मुंबई : राज्यभरात मराठा आंदोलन हिंसक वळण घेत असताना राज्य पोलीस दलाकडून कठोर पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात कोणीही कायदा हातात घेऊ नये. अन्यथा कारवाई अटळ असल्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी सांगितले आहे. राज्यभरात हिंसक आंदोलनांप्रकरणी हत्येच्या प्रयत्नाच्या कलम ३०७ अन्वये दाखल सात गुन्ह्यांसह १४१ गुन्हे नोंदवत आतापर्यंत १६८ जणांना अटक करण्यात आली आहे. १४६ आरोपींना कलम ४१ अ नुसार नोटीस बजावण्यात आल्याचेही रजनीश शेठ यांनी सांगितले.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा समाज आक्रमक झाला आहे. राजकीय नेतेमंडळींना लक्ष करत दगडफेक, तोडफोड आणि जाळपोळ सुरु झाल्याने पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. विविध ठिकाणी आंदोलने सुरु आहेत. काही ठिकाणी शांततेत आंदोलने झाली आहेत. तर, काही ठिकाणच्या आदोलनांना हिंसक वळण मिळाले आहे. यातील संभाजी नगरमध्ये झालेल्या आंदोलनांप्रकरणी ५४ गुन्हे दाखल झाले असून १०६ जणांना अटक करण्यात आली आहे. बीडमध्ये २० गुन्हे दाखल झाले असून बीडमध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. सोबतच संभाजी नगर ग्रामीण, जालना व बीडमध्ये ४८ तासांसाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या आहेत. नागरिकांना शांततेसह कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन रजनीश सेठ यांनी केलेआहे. आंदोलनाच्या आडून काही समाजकंटक आंदोलनाला गालबोट लावत आहे. अशाच समाजकंटकाविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासही सुरुवात करण्यात आली आहे.
१२ कोटीचे नुकसान
हिंसक आंदोलनात तोडफोड आणि जाळपोळीमुळे राज्यात १२ कोटी रुपयांच्या सरकारी मालमत्तेचे नुकसान झाले आहे. राज्यात आता पर्यंत १७ एसआरपीएफच्या कंपन्या तैनात करण्यात आल्या असून सात हजार होमगार्डही त्यांच्या दिमतीला आहे. तसेच, बीडमध्ये रॅपीड एक्शन कंपनीची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे. तसेच, पोलिसांनी नागरिकांना शांततेसह कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले आहे.
सोशल मीडियावर विशेष लक्ष
राज्य सायबर पोलिसांकडून सोशल हालचालींवर विशेष लक्ष आहे. अशावेळी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात येत आहे.