मुंबई - केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या पेट्रोलियम अँड एक्सप्लोसिव्ह विभागात उपअभियंतापदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्याकडे त्याच्या उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतापेक्षा १४१ टक्के अधिक मालमत्ता सापडली आहे.
सीबीआयने त्याला अटक केली असून, त्याच्या नवी मुंबई व नागपूर येथील मालमत्तेवर छापेमारी केली आहे. त्याच्याकडे १ कोटी ४३ लाखांची मालमत्ता आढळली आहे. ही मालमत्ता त्याच्या व त्याच्या कुटुंबीयांच्या नावावर आहे. या लाचखोरीचे पैसे त्याने एका खासगी व्यक्तीकडे ठेवले होते. या प्रकरणात संबंधित खासगी व्यक्तीलादेखील अटक करण्यात आली आहे.
संबंधित अधिकारी एप्रिल २०२१ ते जानेवारी २०२४ या कालावधीमध्ये मुंबई व नागपूर, अशा दोन्ही ठिकाणांचा कार्यभार सांभाळत होता. एका खासगी कंपनीच्या परवानाच्या नूतनीकरणासाठी त्याने लाचेची मागणी केली होती. हे लाचेचे पैसे या अधिकाऱ्याने संबंधित खासगी व्यक्तीकडे देण्यास सांगितले होते. या खासगी कंपनीने याप्रकरणी ‘सीबीआय’कडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर ‘सीबीआय’ने सापळा रचला होता. त्यानंतर खासगी कंपनीने अधिकाऱ्याने सांगितलेल्या व्यक्तीला १० लाख रुपयांची लाच दिली. लाचेची रक्कम घेताना खासगी व्यक्तीला अटक करण्यात आली.