कर्ज न फेडणाऱ्या विकासकाची २०० कोटींची मालमत्ता जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 11:22 AM2023-10-04T11:22:36+5:302023-10-04T11:24:00+5:30
कर्जाची परतफेड न करणाऱ्या एका विकासकाची मुंबईतील २०० कोटींची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दंडाधिकारी न्यायालयाने दिले आहेत.
मुंबई : कर्जाची परतफेड न करणाऱ्या एका विकासकाची मुंबईतील २०० कोटींची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दंडाधिकारी न्यायालयाने दिले आहेत. जयेश टन्ना असे त्या विकासकाचे नाव असून त्याच्या विरोधात ९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
२०० कोटींचे कर्ज चुकवल्यामुळे ॲसेट्स केअर ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन्स एंटरप्रायझेसने तन्ना यांची मालमत्ता जप्त करण्यासाठी कोर्टात अर्ज दाखल केला होता. दंडाधिकारी एम आर ए शेख यांनी याप्रकरणी नऊ वकिलांची एक टीम कोर्ट कमिशनर म्हणून नियुक्त केली. साईसिद्धी डेव्हलपर्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विकासकाच्या एस्केटिक्स प्रायव्हेट लिमिटेडच्या बोरीवली, अंधेरी, गोरेगाव, दक्षिण मुंबई आणि कांदिवली येथील मालमत्तांचा ताबा कोर्ट कमिशनरनी घेतला आहे. विकासकाने व त्याच्या नातेवाइकांनी बहुतेक फ्लॅट हे तृतीयपंथींना विकले इतकेच नव्हे तर विकासकाच्या माणसांनी फ्लॅटचा ताबा देण्यास टाळाटाळ करत प्रवेश नाकारला, असे कोर्ट कमिशनरने सांगितले.