मालमत्ता लाखोंची, कुलूप शंभराचे! कुलूप खरेदी करताना नागरिकांची काटकसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:06 AM2021-01-02T04:06:12+5:302021-01-02T04:06:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : सर्वसामान्य माणूस घर महागाचे घेतो, घराच्या आत वस्तूही लाखमोलाच्याच असतात. मात्र घराचे कुलूप खरेदी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सर्वसामान्य माणूस घर महागाचे घेतो, घराच्या आत वस्तूही लाखमोलाच्याच असतात. मात्र घराचे कुलूप खरेदी करताना तो काटकसर करीत असतो. बाजारातून अत्यंत हलक्या दर्जाचे आणि आणि स्वस्त कुलूप खरेदी करण्याकडे अनेकांचा कल असतो. यामुळे चोऱ्या करणाऱ्यांचे मात्र फावते. हलक्या दर्जाचे कुलूप चोर व दरोडेखोर तोडून घरफोडी करतात. यामुळे कुलूप खरेदीच्या बाबतीत केलेली काटकसर अनेकांना महागात पडते. घर खरेदी करताना घरातील प्रत्येक वस्तू घरमालक पडताळणी करून घेतो. घरातील इंटेरियर तसेच रंगकाम या गोष्टींवर लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र कुलूप खरेदीसाठी पाचशे आणि हजार रुपयेदेखील खर्च करीत नाही.
मागील वर्षभरात मुंबईत घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक जण आपले राहते घर सोडून गावी निघून गेले होते. याचा फायदा घेत चोरट्यांनी अनेक परिसरांमध्ये घरफोड्या करून ऐवज लंपास केला. या घरफोड्यांमध्ये अनेक घरांचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केल्याचे पाहायला मिळाले. ब्रँडेड कंपनीचे व महागडे कुलूप चोरट्यांना सहजासहजी तोडता येत नसल्याचे दिसून येते. मात्र स्वस्तातले कुलूप कितीही मोठे असले तरीदेखील चोरटे ते सहजपणे तोडतात. २०१९च्या तुलनेत २०२० मध्ये घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. मुंबईतील अनेक दुकानदारांच्या मते ग्राहक शंभर ते दोनशे रुपयांचे कुलूप खरेदी करणे अधिक पसंत करतात. क्वचित एखादा ग्राहकच हजार रुपयांचे ब्रँडेड कुलूप खरेदी करतो. स्वस्तातल्या कुलपाला ऊन-पावसाच्या माऱ्यात लवकर गंज चढतो. तसेच चोरट्यांजवळ असणाऱ्या हत्यारांनीदेखील ती कुलुपे लगेच तुटतात. त्यामुळे स्वस्तातले कुलूप घराची सुरक्षा करू शकत नाही.
वर्षभरात झाल्या १८८९ घरफोड्या
मुंबईतील विविध परिसरात मागील वर्षभरात घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक जण आपले राहते घर सोडून आपल्या मूळ गावी निघून गेले. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी घरफोड्या करून लाखोंचा ऐवज लुटून नेला. मागील वर्षभरात मुंबईत एकूण १,८८९ घरफोड्या झाल्या. त्यातील ८६३ गुन्ह्यांची उकल झाली.
या कुलुपांना जास्त मागणी
नॉब लॉक - २० टक्के
कॅप लॉक - १० टक्के
डेडबोल्ट लॉक - १५ टक्के
पॅड लॉक - ४०
मोर्डिज लॉक - १५ टक्के
दणकट आणि महाग कुलूप - १० टक्के
कमी
दणकट आणि कमी महाग कुलूप - ४० टक्के
अगदीच कमी दणकट आणि स्वस्त कुलूप - ५० टक्के
...........
सर्वांत महाग कुलूप - ३००० रुपये
सर्वांत स्वस्त कुलूप - १५० रुपये