राणा कपूर व वाधवा बंधूंच्या २,५०० कोटींच्या मालमत्ता जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 05:14 AM2020-07-10T05:14:34+5:302020-07-10T05:14:51+5:30
‘सीबीआय’चे प्रकरण गुन्हेगारी स्वरूपाचे कारस्थान व विश्वासघात यासारख्या फौजदारी गुन्ह्यांशी संबंधित आहे तर ‘ईडी’ने त्याच संदर्भात मनी लॉड्रिंगचा गुन्हा नोंदविला आहे. कपूर यांना ‘ईडी’ने गेल्या मार्चमध्ये तर ‘सीबीआय’ने वाधवा बंधूंना एप्रिलमध्ये त्यांच्या महाबळेश्वर येथील फार्महाऊसमधून अटक केली होती.
नवी दिल्ली : येस बँक कर्जघोटाळा प्रकरणी त्या बँकेचे सहसंस्थापक राणा कपूर व आता दिवालखोरीत गेलेल्या दिवाण हौसिंग फायनान्स कॉर्पोरेशनचे प्रवर्तक बंधू कपिल आणि धीरज वाधवा यांच्या सुमारे २,२०० कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्तांवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी जप्ती आणली.
‘ईडी’मधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जप्ती आणलेल्य राणा कपूर यांच्या मालमत्तांची किंमत १,१०० कोटी रुपये असून त्यांत मुंबईतील पेडररोडवरील बंगला, मलबार हिलवरील सहा फ्लॅट््स, दिल्लीच्या अमृता शेरगिल मार्गावरील ४८ कोटी रुपयांचे घर, लंडनमधील दोन, न्यूयॉर्कमधील एक व आॅस्ट्रेलियातील एक मालमत्ता तसेच पाच आलिशान मोटारींचा समावेश आहे.
या मालमत्ता राणा कपूर व त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर
आहेत. या प्रकरणात विदेशातीलमालमत्ता जप्त करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
परदेशातील मालमत्ताही
सूत्रांनुसार वाधवा बंधूंच्या १,४०० कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या असून त्यात भारताप्रमाणेच परदेशातील मालमत्तांचाही समावेश आहे. येस बँकेतील कर्जघोटाळा प्रकरणी ‘सीबीआय’ व ‘ईडी’ने दोन स्वतंत्र खटले दाखल केले आहेत.
‘सीबीआय’चे प्रकरण गुन्हेगारी स्वरूपाचे कारस्थान व विश्वासघात यासारख्या फौजदारी गुन्ह्यांशी संबंधित आहे तर ‘ईडी’ने त्याच संदर्भात मनी लॉड्रिंगचा गुन्हा नोंदविला आहे. कपूर यांना ‘ईडी’ने गेल्या मार्चमध्ये तर ‘सीबीआय’ने वाधवा बंधूंना एप्रिलमध्ये त्यांच्या महाबळेश्वर येथील फार्महाऊसमधून अटक केली होती.
‘सीबीआय’च्या आरोपपत्रानुसार राणा कपूर व वाधवा बंधूनी परस्परांचा लाभ करण्यासाठी आपापल्या कंपन्यांच्या माध्यमातून कर्जाचे व्यवहार केले. दिवाण हाऊसिंगच्या एका उपकंपनीला येस बँकेने ७५० कोटी रुपयांचे कर्ज दिले. याच्या बदल्यात दिवाण हौसिंगने राणा कपूर यांच्या कन्या संचालक असलेल्या कंपनीला ६०० कोटी रुपयांचे मालमत्ता तारण कर्ज मंजूर केले. येस बँकेकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम वाधवा यांनी १५० बनावट कंपन्या स्थापन करून देशाबाहेर पसार केली. या ६०० कोटी रुपयांच्या कर्ज रकमेचा गुन्हेगारी अपहार केल्याप्रकरणी ‘ईडी’ने खटला दाखल केला आहे.