के पूर्व वॉर्ड मध्ये इमारतींमध्ये कोरोनाचे प्रमाण जास्त; कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेचे युद्धपातळीवर प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 08:25 PM2020-07-03T20:25:32+5:302020-07-03T20:25:51+5:30
रोज बाहेरून नोकरीसाठी येणाऱ्या नागरिकांचे प्रमाण 40 टक्के आहे.तर याभागात स्लमचे प्रमाण देखिल जास्त आहे.
- मनोहर कुंभेजकर
मुंबई: पालिकेच्या के पूर्व वॉर्ड मध्ये विलेपार्ले पूर्व ते जोगेश्वरी पूर्व भागाचा समावेश असून येथील लोकसंख्या सुमारे 10 लाखांच्या आसपास आहे.या वॉर्ड मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय व आंतरदेशीय अशी दोन विमानतळे, सीप्झ व एमआयडीसी अशी दोन मोठी आस्थापने अनेक आयटी व अन्य उद्योग मोडतात. रोज बाहेरून नोकरीसाठी येणाऱ्या नागरिकांचे प्रमाण 40 टक्के आहे.तर याभागात स्लमचे प्रमाण देखिल जास्त आहे.
के पूर्व वॉर्ड मध्ये दि,1 जुलैच्या आकडेवारी नुसार एकूण कोरोना रुग्णांची संख्या 5401 इतकी असून ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण 2455 असून 2611 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत,तर 276 कोरोना रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.24 जून ते 1 जुलै पर्यंत याठिकाणी कोरोना वाढीचे प्रमाण 1.8 टक्के इतके आहे.
स्लममध्ये कोरोना आता नितंत्रणात असून या वॉर्ड मध्ये इमारतींमध्ये कोरोनाचे प्रमाण वाढत आहे.के पूर्व वॉर्डचे सहाय्यक आयुक्त प्रशांत सकपाळे यांनी लोकमतला ही माहिती दिली.पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्या मार्गदर्शनाखाली चेस द व्हायरस व मिशन झिरो ही मोहिम युद्धपातळीवर राबवण्यात येत आहे.त्यामुळे कागदावर जरी कोरोना रुग्णांची एकूण संख्या जास्त दिसत असली तरी,आतापर्यंत 50 टक्के रुग्ण या वॉर्ड मध्ये कोरोना मुक्त होऊन घरी परतले असल्याची माहिती त्यांनी दिली.
आमचा भर प्रामुख्याने हा कोरोना रुग्ण शोधून काढण्यावर आहे.जर एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला तर त्यांच्या संपर्कातील सुमारे 20 नागरिकांना क्वारंटाईन करण्यात येते.या वॉर्डमध्ये घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करण्यात येत असून येथे 12 आरोग्य केंद्रात सहाय्यक आरोग्य अधिकारी यांच्या देखरेखीखाली कम्युनिटी हेल्थ वर्कर्स सतत कार्यरत आहेत.
वस्ती वस्तीत जाऊन आरोग्य शिबीर घेण्यावर आमचा भर आहे. आमच्या मदतीला भारतीय जैन संघटना व क्रेडाई यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे.मोबाईल व्हॅन या विभागात येथील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी करत आहे. जर संशयित कोरोना रुग्ण आढल्यास त्याची स्वॅब टेस्ट करून ऑक्सिजनची गरज भासल्यास उपलब्ध करून दिला जातो,जेष्ठ नागरिकांची विशेष काळजी घेणे यासाठी आमचे संबंधित अधिकारी व कर्मचारी,वैद्यकीय आरोग्य अधिकारी व त्यांचे अधिकारी व कर्मचारी येथील कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी अविरत मेहनत घेत आहे. तर सर्व लोकप्रतिनिधींचे व मुंबई पोलिसांचे चांगले सहकार्य या वॉर्डला मिळत असल्याची माहिती प्रशांत सकपाळे यांनी शेवटी दिली.