सीएचबी प्राध्यापकांच्या नियुक्तीचा प्रस्ताव धूळखात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:24 AM2020-12-15T04:24:03+5:302020-12-15T04:24:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : उच्चशिक्षण संचालक कार्यालयाने सीएचबी प्राध्यापकांच्या नियुक्तीसंदर्भात शासनाकडे पाठविलेला प्रस्ताव सुमारे महिन्याभरापासून शासनाकडे धूळखात पडून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उच्चशिक्षण संचालक कार्यालयाने सीएचबी प्राध्यापकांच्या नियुक्तीसंदर्भात शासनाकडे पाठविलेला प्रस्ताव सुमारे महिन्याभरापासून शासनाकडे धूळखात पडून आहे.
राज्यातील अनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापकांची हजारो पदे रिक्त आहेत. परिणामी, महाविद्यालयात तासिका तत्त्वावरील (सीएचबी) प्राध्यापकांची नियुक्ती करून महाविद्यालयीन शैक्षणिक कामकाज चालविले जात आहे. मात्र, त्यांचे करार संपुष्टात आले आहेत, परंतु शासनाने भरतीच्या प्रक्रियेवर बंदी घातल्यामुळे सीएचबी प्राध्यापकांच्या नियुक्तीवरही परिणाम झाला आहे. करार संपल्याने तुटपुंजे मिळणारे मानधन बंद असून, राज्यातील जवळपास १५ ते २० हजार प्राध्यापकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे तातडीने या प्राध्यापकांची भरती करण्याची मागणी सीएचबी प्राध्यापक, शिक्षक संघटनांनी केली आहे.
सध्या महाविद्यालये बंद असली, तरी ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या नियुक्त्या नसल्याने, ऑनलाइन शिक्षणाचा अतिरिक्त ताण नियमित प्राध्यापकांवर पडत आहे. त्यामुळे तत्काळ प्राध्यापकांची भरती करावी, अशी मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे अनिल बोरनारे यांनीही केली.
प्राध्यापक भरती होत नसताना, सीएचबी प्राध्यापकांची भरतीही केली नाही, तर महाविद्यालयांचे कामकाज करणे शक्य होणार नाही. त्यामुळे शासनाने तत्काळ सीएचबी प्राध्यापकांच्या भरतीला परवानगी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र स्टुडंन्ट वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष वैभव एडके यांनी केली.
..........................
-----------------