मुंबई - महाविकास आघाडीच्या जागावाटपावर अंतिम चर्चा सुरू असून २७ फेब्रुवारी रोजी महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीला स्वत: प्रकाश आंबेडकर उपस्थित नव्हते. पण, वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी त्यांनी पाठवले होते. त्यामुळे, अद्यापही महाविकास आघाडीसोबत वंचित बहुजन आघाडीची जागावाटपावर चर्चा सुरू आहे. त्यातच, प्रकाश शेंडगे यांच्यासमवेत प्रकाश आंबेडकर यांनी परभणीत सभा घेतली. त्यानंतर, वंचित बहुजन आघाडी आणि ओबीसी बहुजन पक्ष एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यावर, वंचितकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
वंचित बहुजन आघाडी आणि ओबीसी बहुजन पक्ष एकत्र येण्याची प्रक्रिया अगोदरपासूनच सुरु असून आम्ही दोघेही एकत्रच आहोत. आघाडी करण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांना उद्याच पत्र देण्यात येणार आहे. आरक्षणावादी आम्ही दोघे एकत्र आल्यास या राज्यात सामाजिक आणि राजकीय क्रांती होईल अशी प्रतिक्रिया ओबीसी नेते माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी दिली होती. त्यानंतर, आता वंचित बहुजन आघाडीने स्पष्टीकरण देत अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे म्हटले आहे.
वंचित बहुजन आघाडीची जेव्हा कुठल्याही पक्षासोबत युती नव्हती, कोणासोबतच आमची चर्चा नव्हती, तेव्हा आम्ही महाराष्ट्रात लोकसभेच्या २७ जागांवर लक्ष केंद्रित केले होते. महाविकास आघाडीने जेव्हा आमच्याकडे प्रस्ताव मागितला, तेव्हा आम्ही ज्या २७ मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले होते, त्या जागांचा प्रस्ताव महाविकास आघाडीला दिला. ह्या जागांवरील काही जागांवर ह्या वाटाघाटी होऊ शकणाऱ्या आहेत, त्यासाठी आम्ही चर्चेला तयार आहोत आणि त्या चर्चेतून सुटतील हा आम्हाला विश्वास आहे. माध्यमांमधून वंचित बहुजन आघाडीबद्दल जो अपप्रचार सुरू आहे, तो त्यांनी थांबवावा, असे स्पष्टीकरण वंचित बहुजन आघाडीचे सोशल मीडिया प्रमुख जित्रत्न पतैत यांनी दिले आहे. पतैत यांनी अधिकृत अकाऊंटवरुन याबाबत भूमिका मांडली.
काय म्हणाले प्रकाश शेंडगे
महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा निर्णय उद्याच घ्यावा असे पत्र वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांना दिले आहे. त्या पार्श्वभूमीवर शेंडगे यांच्या वक्तव्याला महत्व आले आहे. त्यासंदर्भात शेंडगे म्हणाले की, सरकारने ओबीसी समाजाला स्वतंत्रपणे दहा टक्के आरक्षण दिले आहे. त्यामुळे स्वताहाला मोठा भाऊ समजणार्या मराठा समाजाने ओबीसीतून आरक्षण मागू नये. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी ओबीसीचे आरक्षण दिले आहे. त्यामुळे ते आरक्षण टिकविण्याची जबाबदारी प्रकाश आंबेडकर यांच्यावर असल्याच्या भावनेतून ते आमच्यासोबत आहेत. दोन्ही आरक्षणवादी पक्ष एकत्र आल्यास आमचेच नेते, आमचेच मंत्रालय आणि आमचीच विधानसभा राहणार आहे. दलित, भटके, ओबीसी एकत्र आल्यास या राज्यात राजकीय आणि सामाजिक क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. असेही शेंडगे म्हणाले. यावेळी मराठवाडा समन्वयक ॲड.अविनाश भोसीकर, महेंद्र देमगुंडे यांची उपस्थिती होती.