दुष्काळ निवारणासाठी ७९६२ कोटींचा प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2018 04:58 AM2018-12-08T04:58:12+5:302018-12-08T04:58:24+5:30
राज्यातील दुष्काळ निवारणासाठी केंद्र शासनाकडे ७ हजार ९६२ कोटी रुपयांचा प्रस्ताव दिला असून जास्त निधी मिळावा, अशी मागणी केल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
मुंबई : राज्यातील दुष्काळ निवारणासाठी केंद्र शासनाकडे ७ हजार ९६२ कोटी रुपयांचा प्रस्ताव दिला असून जास्त निधी मिळावा, अशी मागणी केल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. राज्याला मदत देण्यासाठी केंद्राच्या पथकाने सहमती दर्शविली असून पाहणी अहवाल लवकर सादर करणार, असे सहसचिव श्रीमती छवी झा यांनी सांगितले.
दुष्काळ स्थितीच्या पाहणीसाठी केंद्राच्या तीन पथकांनी राज्यात दौरे केले. शुक्रवारी सह्याद्री अतिथीगृहात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. राज्यात सुमारे ९८ लाख मेट्रिक टन चारा उपलब्ध असून आणखी चाºयाची आवश्यकता आहे. त्यासाठी राज्याने गाळपेर जमिनीवर चारा उत्पादनासाठी प्रोत्साहित केले आहे. त्यातून ५० हजार हेक्टर क्षेत्रावर सुमारे २५ लाख मेट्रिक टन चारा उत्पादन होईल, असा अंदाज असल्याचे सांगण्यात आले.
>महात्मा गांधी रोजगार हमीवर भर
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून दुष्काळी भागात अतिरिक्त ५० दिवसांचे काम देण्यासाठी केंद्र शासनाकडे ८५ कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविला आहे. या तसेच दुष्काळ निवारणासाठी पाठविलेल्या विविध प्रस्तावांना तातडीने मंजुरी मिळावी, अशी राज्याच्या वतीने मागणी करण्यात आली आहे.