Join us  

पशुवैद्यकीय दवाखाना उभारण्याचा प्रस्ताव स्थगित

By admin | Published: July 03, 2014 2:48 AM

सानपाडा सेक्टर २४ मध्ये पशुवैद्यकीय दवाखाना उभारण्यास नगरसेवकांनी तीव्र विरोध केला आहे

नवी मुंबई : सानपाडा सेक्टर २४ मध्ये पशुवैद्यकीय दवाखाना उभारण्यास नगरसेवकांनी तीव्र विरोध केला आहे. यासाठी औद्योगिक वसाहतीमध्ये जागा शोधण्याच्या सूचना प्रशासनास केल्या असून सर्वसाधारण सभेने सदर प्रस्ताव स्थगित केला आहे. नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये पालिकेचा एकही पशुवैद्यकीय दवाखाना नाही. श्वान नियंत्रण केंद्रासाठीही जागा नसल्यामुळे सदर केंद्र डंपिंग ग्राऊंडजवळील मोकळ्या जागेवर सुरू केले आहे. सिडकोने पालिकेस सानपाडा सेक्टर २४ मध्ये ९२० चौरस मीटर भूखंड कत्तलखाना व पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी दिला आहे. पालिकेने कत्तलखाना न बांधण्याचा निर्णय घेतला असून सदर ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखाना सुरू करण्यासाठी वापर बदल करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मांडला होता. नगरसेवकांनी या प्रस्तावास विरोध केला आहे. काँगे्रस नगरसेवक रंगनाथ औटी यांनी सांगितले की, सदर ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखाना केला तर नागरिक तीव्र आंदोलन करतील. हा भूखंड खेळाच्या मैदानासाठी राखून ठेवावा अशी मागणी केली. काशीनाथ पाटील यांनीही या प्रस्तावास विरोध केला. नामदेव भगत यांनी नागरिकांचे मत विचारात घेवून हा प्रस्ताव रद्द करावा. सिडकोकडून औद्योगिक वसाहतीमध्ये दुसरी जागा मागावी. सिडको संचालक म्हणून मीही दुसरी जागा मिळवून देण्यासाठी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांशी चर्चा करतो असे मत मांडून सदर प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली. सर्वपक्षीय नगरसेवकांच्या विरोधामुळे हा प्रस्ताव स्थगित करण्यात आला. (प्रतिनिधी)