१३ जूनपासून शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव, वर्षभरात 76 सुट्ट्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 08:33 AM2022-04-01T08:33:51+5:302022-04-01T08:34:23+5:30
शिक्षण संचालनालयाच्या प्रस्तावानुसार, सुट्टीचा कालावधी २ मेपासून ग्राह्य धरण्यात येणार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ ची उन्हाळी सुट्टी २ मेपासून तसेच नव्या शैक्षणिक वर्षातील शाळा १३ जूनपासून सुरू केल्या जाव्यात, असा प्रस्ताव शिक्षण संचालनालयाने शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना दिला आहे. शिक्षण संचालनालयाने दिलेल्या प्रस्तावित बाबी विचारात घेऊन उन्हाळ्याच्या सुट्टीबाबत परिपत्रक जाहीर करावे, अशी विनंती केली आहे.
शिक्षण संचालनालयाच्या प्रस्तावानुसार, सुट्टीचा कालावधी २ मेपासून ग्राह्य धरण्यात येणार असून ही सुट्टी १२ जूनपर्यंत असणार आहे. तर नव्या शैक्षणिक वर्षात जूनच्या दुसऱ्या सोमवारी म्हणजे १३ जून रोजी विदर्भ वगळता राज्यातील सर्व शाळा सुरू होतील. या प्रस्तावावर प्रधान सचिवांनी अंतिम निर्णय घेतल्यानंतर शैक्षणिक वर्षाची नेमकी तारीख ठरणार आहे.
एकूण ७६ सुट्ट्या
उन्हाळ्याची व दिवाळीची दीर्घ सुट्टी कमी करून त्याऐवजी गणेशोत्सव किंवा नाताळसारख्या सणांच्या सुट्ट्यांचे नियोजन करण्यात यावे. एकूण सुट्ट्या ७६ दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी.