Join us

मेट्रो-३ कारडेपोच्या बांधकामामध्ये बाधित होणारी २२३८ झाडे तोडण्याचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2019 3:08 AM

पर्यावरणवाद्यांचा विरोध कायम; निर्णयाकडे सर्वांचेच लक्ष

मुंबई : मेट्रो-३ प्रकल्पासाठी आरे कॉलनीमध्ये कार डेपो बांधण्याचे प्रस्तावित आहे. या डेपोच्या बांधकामामध्ये २ हजार २३८ झाडे बाधित ठरत आहेत. बाधित ठरणारी झाडे कापण्याचा प्रस्ताव अखेर वृक्ष प्राधिकरणाकडे सादर झाला असून लवकरच यावर निर्णय होणार आहे. आरेमधील झाडे तोडण्यास पर्यावरणवाद्यांनी तीव्र विरोध दर्शवला असून जर ही झाडे तोडण्याचा निर्णय झाला तर आम्ही याविरोधात न्यायालयामध्ये याचिका दाखल करू, असे पर्यावरणवादी संघटनेच्यावतीने सांगण्यात आले.आरे कॉलनीमधील मेट्रो डेपोच्या बांधकामामध्ये बाधित होणारी २ हजार २३८ झाडे तोडण्याचा आणि ४६४ झाडांचे पुनर्रोपण करण्याचा प्रस्ताव मुंबई मेट्रो रेल कॉपोर्रेशनने (एमएमआरसी) वृक्ष प्राधिकरणापुढे मंजुरीसाठी ठेवला आहे. लवकरच यावर निर्णय घेण्यात येणार आहे. जुलै २०१७ मध्ये येथील झाडे तोडण्याचा प्रस्ताव एमएमआरसीने पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडे सादर केला होता. पर्यावरणवाद्यांनी यास विरोध करत याविरोधात न्यायालयामध्ये धाव घेतली. यामुळे यावर निर्णय घेण्यात आला नाही. न्यायालयाने पर्यावरणवाद्यांचे म्हणणे ऐकून घेण्याच्या सूचना केली होती. यानुसार त्यांच्या सुचना आणि हरकती जाणून त्याबाबतचा अहवाल वृक्ष प्राधिकरणाने न्यायालयामध्ये सादर केला होता. आता पुन्हा आरेतील झाडे तोडण्याचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणापुढे सादर करण्यात आला आहे.याआधी सप्टेंबर २०१८ मध्ये वृक्ष प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी याची पाहणी केली होती. तर जुलै २०१९ मध्येही याची पाहणी झाली होती. यानुसार आरेतील झाडे तोडण्याचा प्रस्ताव पुन्हा वृक्ष प्राधिकरणापुढे मंजुरीला आला आहे. आरेमध्ये एकूण ३ हजार ६६१ झाडे आहेत. यातील २७०२ इतकी झाडे आरे वसाहतीतील कार डेपोच्या बांधकामासाठी बाधित होत आहेत. यामधील २२३८ झाडे तोडण्यात येणार आहेत. पर्यावरण वाद्यांची सुनावणी जरी झाली असली तरी त्यांचे समाधान झालेले नाही. यामुळे तब्बल दोन वर्षांनी हा प्रस्ताव पुन्हा मंजुरीला आल्याने या प्रस्तावावर काय निर्णय होतो याकडेच सर्वांचे लक्ष आहे. जर ही झाडे तोडण्याचा निर्णय घेण्यात आला तर आम्ही यास जोरदार विरोध करणार असून या विरोधात न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार सल्याचे ‘सेव्ह ट्री’ संघटनेचे सदस्य झोरू बाथेना यांनी सांगितले.

टॅग्स :मेट्रो