विकासकामांचे प्रस्ताव निवडणुकीपर्यंत लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 01:13 AM2019-03-13T01:13:07+5:302019-03-13T01:13:25+5:30

सुट्टीच्या दिवशी महासभा; स्थायी समितीचे कामकाज थंडावले

Proposals for development works will be postponed till election | विकासकामांचे प्रस्ताव निवडणुकीपर्यंत लांबणीवर

विकासकामांचे प्रस्ताव निवडणुकीपर्यंत लांबणीवर

Next

मुंबई : निवडणुकीच्या तोंडावर चार बैठकांमध्ये २४५० कोटींच्या प्रस्तावांना झटपट मंजुरी देणाऱ्या स्थायी समितीचा कारभार आचारसंहितेमुळे थंडावला आहे. मतदारांना प्रभावित करणाऱ्या प्रकल्पांवर निर्बंध असल्याने अनेक विकासकामांना आता निवडणुकीच्या काळात खीळ बसणार आहे. असे काही स्थायी समितीच्या पटलावर मांडलेले प्रस्ताव प्रशासनाने आज चक्क मागे घेतले. यामुळ रस्ते डांबरीकरण, मलनिस्सारण वाहिन्यांची कामे आता निवडणुकीपर्यंत लांबणीवर पडली आहेत.

पालिकेची आर्थिक नाडी स्थायी समितीच्या हाती असते. त्यामुळे या समितीच्या मंजुरीनंतरच विकासकामांसाठी निधी मंजूर होतो. मात्र अनेक कारणांमुळे गेल्या काही महिन्यांत खोळंबलेली विकासकामे या समितीने आचारसंहितेपूर्वी दहा दिवसांत मंजूर केली. अनेक विकासकामांना कोणत्याही चर्चेविना २८ फेब्रुवारी ते ९ मार्च या कालावधीत तब्बल २४५० कोटींचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. सुट्टीच्या दिवशी महासभा बोलावून या सर्व प्रकल्पांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

आपल्या प्रभागातील कामांना मंजुरी मिळविण्यासाठी नगरसेवकांची धावपळ सुरू होती. आचारसंहिता लागू होताच पालिकेचे कामकाज थंडावले आहे. स्थायी समितीच्या बैठकीत मांडण्यात आलेले विकासकामांचे काही प्रस्ताव प्रशासनाने मंगळवारी मागे घेतले. यामध्ये ई विभागातील मैदानाचा विकास करणे, भांडुप पश्चिम येथे मलनिस्सारण वाहिनी पुरविणे व टाकणे, एच/पूर्व, के/पूर्व व पी/दक्षिण, एम पूर्व या विभागांमध्ये रस्त्यांचे डांबरीकरण व पुनर्पृष्ठीकरण करण्याच्या कामांचा समावेश आहे.

वर्षभरातील एकतृतीयांश कामांना परवानगी
स्थायी समितीची बैठक आठवड्यातून एकदाच होत असते. या बैठकीत प्रशासनाने मांडलेल्या नागरी सुविधा व प्रकल्पांच्या प्रस्तावांवर चर्चा होऊन स्थायी समिती मंजुरी देत असते. २८ फेब्रुवारी ते ९ मार्च या कालावधी स्थायी समितीमध्ये तब्बल २४५० कोटी म्हणजे वर्षभरातील एक तृतीयंश विकास कामांचा निधी मंजूर करण्यात आला.

हे महत्त्वाचे प्रस्ताव लागले मार्गी
दादर पश्चिम येथील जगन्नाथ शंकर शेठ उड्डाणपुलाच्या खाली सुशोभीकरण, पाण्याची गळती रोखणे, पालिका शाळेची दुरुस्ती, आठ पुलांची दुरुस्ती, कस्तुरबा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान, विलेपार्ले येथील कूपर रुग्णालय परिसरात वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम, शाळांच्या सुरक्षा-स्वच्छता-देखभाल

हे प्रस्ताव रखडले
चेंबूर, गोरेगाव, वांद्रे, अंधेरी येथील रस्त्यांच्या डांबरीकरणाचा प्रस्ताव, भायखळा येथील मैदानाचा विकास, भांडुपमधील मलनिस्सारण वाहिन्यांच्या कामांना स्थायी समितीची मंजुरी मिळालेली नाही. मे महिन्यापर्यंत आचारसंहिता आहे़ त्यानंतर जून ते सप्टेंबर पावसाळा असतो. त्यानंतर विधानसभा निवडणुका असल्याने ही कामे रखडण्याची शक्यता आहे.

Web Title: Proposals for development works will be postponed till election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.