Join us

‘रुसा’च्या निधीसाठी ११ विद्यापीठांनी दाखल केले प्रस्ताव

By admin | Published: August 05, 2015 1:53 AM

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाचा (रुसा) निधी मिळवण्यासाठी राज्यातील ११ विद्यापीठांनी शासनाला प्रस्ताव पाठवले असून, लवकरच

मुंबई : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाचा (रुसा) निधी मिळवण्यासाठी राज्यातील ११ विद्यापीठांनी शासनाला प्रस्ताव पाठवले असून, लवकरच त्यास मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. शासनाची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर विद्यापीठांतील पायाभूत सुविधांसाठी प्रत्येक विद्यापीठाला २० कोटी रुपये मिळणार आहेत तर काही शासकीय महाविद्यालयांना प्रत्येकी २ कोटी रुपये मिळणार आहेत, अशी माहिती मुंबई विभागीय उच्च शिक्षण विभागाच्या सह संचालिका डॉ. मंजूषा मोळवणे यांनी दिली. मोळवणे रुसोच्या संपर्क प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत.महाविद्यालय आणि विद्यापीठांमधील शैक्षणिक उपक्रम आणि संशोधनाला गती देण्यासाठी केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने रुसा अभियानाची सुरुवात केली आहे. त्यानुसार हा निधी राज्य शासनाच्या वाट्याने दिला जाणार आहे. विद्यापीठांनी प्रस्तावित केलेल्या निधीत केंद्र आणि राज्याचा वाटा ६५:३५ असा असणार आहे. मुळात राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांच्या वाट्याला येणारा मागील दोन वर्षांतील निधी उच्चशिक्षण परिषदेअभावी गमवावा लागला. सरकार बदलामुळे हा फटका बसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे २०१५-१६ शैक्षणिक वर्षात तरी रुसोचा निधी मिळावा म्हणून प्रस्ताव पाठवण्याची लगीनघाई व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण कार्यालयात दिसून येत आहे.