वाहतूककोंडीवरील प्रस्ताव बासनातच
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 05:30 AM2018-09-20T05:30:23+5:302018-09-20T05:30:50+5:30
धोटे उद्यानाखाली पार्किंग करुन देण्याची हिंदुजा हॉस्पिटलची तयारी
मुंबई : माहिम येथील हिंदुजा हॉस्पिटलसमोर रोजच मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होते. त्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांची या वाहतूककोंडीतून सुटका करण्यासाठी धोटे उद्यानाखाली अंडरग्राउंड पार्किंग करून देण्याची तयारी हिंदुजा हॉस्पिटल व्यवस्थापनाने दर्शवूनही महापालिका त्याबाबत कोणताच निर्णय घेत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
हिंदुजा हॉस्पिटलसमोरच बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये येणाऱ्या पालकांच्या गाड्या सकाळच्या वेळी रस्त्याच्या दुतर्फा उभ्या राहतात. शाळेच्या बस त्याच ठिकाणच्या चौकातून वळण घेतात. रस्ता छोटा असल्याने वळण घेताना शिवाजी पार्ककडून येणारी, हिंदुजाकडून येणारी आणि गोवा पोर्तुगिजकडून येणारी अशा तीनही बाजूंकडील वाहनांमुळे कोंडी सतत होत असते. मात्र यावर पालिका आणि वाहतूक पोलीस कोणताही तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेताना दिसत नाहीत.
येथील वाढती वाहतूककोंडी सुटावी म्हणून हिंदुजा हॉस्पिटल व्यवस्थापनाने हॉस्पिटलसमोर असणाºया धोटे उद्यानाखाली अंडरग्राउंड पार्किंग करून देण्याची तयारी दर्शविली होती. त्यासाठी त्यांनी पालिकेशी पत्रव्यवहारही केला. येथे आमच्या खर्चाने चांगल्या दर्जाची पार्किंग तयार करून देऊ, शिवाय धोटे उद्यानही आहे तसे किंबहुना आहे त्यापेक्षाही चांगले तयार करून देऊ, नंतर पार्किंग पालिकेने कोणालाही चालविण्यास दिली तरी आमची हरकत नाही असा प्रस्ताव दिला, पण त्यावर पुढे काहीच झाले नाही.
वाहतूककोंडीत रुग्णवाहिकाही अडकतात. वाहनांचे हॉर्न, रुग्णवाहिकेचे आवाज यामुळे होणारे ध्वनिप्रदूषण ही येथील समस्या झाली आहे.
येथे कधीही वाहतूक पोलीस वाहतूक नियंत्रणासाठी नसतो, अशी तक्रार येथे राहणाºयांची आहे. आम्ही वाहतूक पोलिसांना टिष्ट्वट करूनही ही माहिती देण्याचा प्रयत्न केला; पण ‘तक्रारीची दखल घेत आहोत,’ या पलीकडे प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार काही रहिवाशांनी केली.
... तर निविदा काढा, पण कोंडी सोडवा
आमच्याकडून पार्किंग तयार करून नको असेल तर पालिकेने निविदा काढून ही पार्किंग तयार करून घ्यावी, ती पे अॅण्ड पार्क पद्धतीने कोणालाही चालवायला द्यावी, मात्र वाहतुकीची रोजच होणारी कोंडी सोडवावी, अशी रास्त भूमिका हॉस्पिटलचे विश्वस्त प्रकाश हिंदुजा यांनी ‘लोकमत’शी बोलताना मांडली.