Join us

हार्बर लोकल सँडहर्स्ट रोडपर्यंत, भायखळ्याला थांबणार नाही फास्ट ट्रेन; मध्य रेल्वे करणार मोठे बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 10:09 AM

Mumbai News : सीएसएमटी ते परळ स्थानकादरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेसाठी हार्बर मार्गावरील लोकल ट्रेन सँडहर्स्ट रोडपर्यंत चालवण्याचा प्रस्ताव मध्य रेल्वेने ठेवला आहे.

Mumbai Local :मुंबईलोकलने प्रवास करणाऱ्या लाखो मुंबईकरांसाठी रेल्वे प्रशासन महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते परळ स्थानकादरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेसाठी मध्य रेल्वेकडून नव्याने चाचपणी करण्यात येत आहे. या कामासाठी सीएसएमटी परिसरातील जागेची मर्यादा लक्षात घेऊन हार्बर मार्गावरील लोकल ट्रेन सँडहर्स्ट रोडपर्यंत चालवण्याचा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाने तयार केला आहे. या प्रस्तावाची आता रेल्वेकडून चाचपणी केली जात आहे. त्यामुळे सीएसएमटी स्थानकावर असलेले हार्बर रेल्वेचे दोन फलाट हे मध्य रेल्वेसाठी अतिरिक्त फलाट म्हणून उपलब्ध होणार आहेत. यासोबत भायखळा स्थानकातील जलद लोकलचा स्टॉप रद्द करण्याचा विचारही केला जात आहे.

प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे मध्य रेल्वे सीएसएमटी आणि परळ दरम्यान पाचवी आणि सहावी रेल्वे मार्गिका सुरु करण्याच्या विचारात आहे. जर हा निर्णय घेतला गेला तर नवीन सीएसएमटी-परळ मार्गिकेसाठी हार्बर रेल्वेचे प्लॅटफॉर्म आणि सीएसएमटी आणि मस्जिद स्थानकादरम्यान ट्रॅकची आवश्यकता असणार आहे. त्यामुळे रेल्वे सँडहर्स्ट रोडवरील हार्बर लाइन सेवा बंद करण्याचा विचारात आहे. तसेच नवीन ट्रॅकसाठी जागा तयार करण्यासाठी भायखळा येथील फास्ट ट्रॅकवरील  प्लॅटफॉर्म बंद करण्याची मध्य रेल्वेची योजना आहे. तसे झाल्यास कुर्लानंतर फास्ट लोकल दादर आणि सीएसएमटी स्थानकांवर थांबणार आहे.

या प्रस्तावांवर गांभीर्याने विचार सुरू असन त्याची व्यवहार्यता तपासली जात आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. या योजनेअंतर्गत, सीएसएमटी आणि मस्जिद बंदर येथील प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि दोनचा वापर मध्य रेल्वेच्या मेन लाइन सेवांसाठी केला जाईल. त्यामुळे सीएसएमटीमधील १ ते ७ पर्यंतचे सर्व प्लॅटफॉर्मवरुन मध्य रेल्वे धावणार आहे.

सध्या, कल्याण आणि एलटीटी दरम्यान पाचवी आणि सहावी लाईन अस्तित्वात आहे. आता ती कुर्ला ते परळ दरम्यान वाढवण्याचे काम सुरू आहे. दहा वर्षांपूर्वी मध्य रेल्वेने डॉकयार्ड रोड ते इस्टर्न फ्रीवेपर्यंत हार्बर लाइनसाठी पर्यायी मार्ग तयार करण्याचा निर्णय घेतला होता. मस्जिद आणि सँडहर्स्ट रोड या दोन्ही ठिकाणी जागा मोकळी करणे हा त्याचा उद्देश होता, जेणेकरून कुर्ला ते सीएसएमटी या पाचव्या आणि सहाव्या मार्गाचा वापर करता येईल. त्यावेळी, मुख्य आणि हार्बर दोन्ही मार्गांसाठी इंटरचेंज पॉइंट उपलब्ध करून देण्यासाठी मशीद आणि सँडहर्स्ट रोड येथे दोन स्टेशन बांधण्याचा प्रस्ताव होता.

२००८ साली एमयूटीपी २ साठी मंजुरी मिळाली होती. त्यामध्ये सीएएमटी ते कुर्लापर्यंत पाचवी सहावी मार्गिका तयार करण्याचे ठरण्यात आलं होतं. त्यासाठी दोन पर्याय होते. पहिला पर्याय म्हणजे बीपीटीची जागा घेऊन दोन लाईन बांधण्यात याव्यात आणि सीएसएमटी स्थानकातील १८ नंबरच्या प्लॅटफॉर्मवर हार्बर लाईन सुरु करावी.  दुसरा पर्याय म्हणजे सँडहर्स्ट रोडपर्यंत हार्बर लोकल चालवण्यात याव्यात. 

टॅग्स :मुंबईमध्य रेल्वेछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसलोकल