Join us

आरोपी पोलिसांचा जामीन नामंजूर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 6:05 AM

कैदी मंजुळा शेट्ये मृत्यूप्रकरणी विशेष महिला न्यायालयाने महिला पोलिसांचा जामीन मंजूर करण्यास मंगळवारी नकार दिला. आरोपी वसिमा शेख, सुरेखा गुळवे आणि बिंदू नायकोडे यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात येत

मुंबई : कैदी मंजुळा शेट्ये मृत्यूप्रकरणी विशेष महिला न्यायालयाने महिला पोलिसांचा जामीन मंजूर करण्यास मंगळवारी नकार दिला. आरोपी वसिमा शेख, सुरेखा गुळवे आणि बिंदू नायकोडे यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात येत आहे, असे विशेष महिला न्यायालयाच्या न्या. शायना पाटील यांनी म्हटले. त्यानंतर न्यायालयाने पुढील सुनावणी १२ डिसेंबर रोजी ठेवली.‘मंजुळा शेट्येचा मृत्यू मारहाणीमुळे झाला नसून नैसर्गिकरीत्या झाला आहे. तिच्या शरीरावर व्रण नाहीत. मात्र, भायखळा कारागृहातील महिला कैद्यांनी दबाव आणल्याने आपल्यावर गुन्हा नोंदवला आहे. आपल्याला यात नाहक गोवण्यात आले आहे,’ असा युक्तिवाद सर्व आरोपींच्या वकिलांनी विशेष न्यायालयात केला.सरकारी वकील विद्या कासले यांनी आरोपींचे म्हणणे खोडत म्हटले की, शेट्येच्या शरीरावर १४ जखमा होत्या. या जखमा मारहाणीमुळेच झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यातील काही जखमा तिच्या मृत्यूस कारणीभूत आहेत. पीडिता अर्जदारांच्या ताब्यात होती. त्यामुळे तिचे रक्षण करण्याची जबाबदारी अर्जदारांची होती. मात्र, त्यांनी तिचे रक्षण करण्याऐवजी तिला मारहाण केली. परिणामी, तिचा मृत्यू झाला. त्यामुळे अर्जदारांचा जामीन मंजूर करावा, अशी ही केस नाही.सुरुवातीला सहाही आरोपींनी जामिनासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला. मात्र, सुनावणीत मनीषा पोखरकर,शीतल शेगावकर, आरती शिंघाणे यांनीअर्ज मागे घेतला.२३ जून रोजी मंजुळाचा मृत्यू झाला. याप्रकरणी भायखळा कारागृहातील महिला कैद्यांनी आवाज उठविल्यवर सहा महिला पोलिसांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.

टॅग्स :गुन्हान्यायालय