अनिल देशमुख ईडीच्या संपर्कात असल्याचा वकिलांचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:06 AM2021-07-21T04:06:31+5:302021-07-21T04:06:31+5:30
देशमुखांच्या पत्नीकडून दुसऱ्यांदा कागदपत्रे सुपुर्द लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख ...
देशमुखांच्या पत्नीकडून दुसऱ्यांदा कागदपत्रे सुपुर्द
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे कोठेही अज्ञातवासात नाहीत. ई-मेलद्वारे ते सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) संपर्कात असल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ते चौकशीला हजर राहणार असताना भाजपाचे किरिट सोमय्या दिशाभूल करणारी माहिती माध्यमांमध्ये पसरवीत असल्याचा दावा त्यांनी केला.
देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख यांच्याकडे ईडीने मागणी केलेली कागदपत्रे मंगळवारी नव्याने सुपुर्द करण्यात आली. मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात ईडीच्या रडारवर असलेल्या देशमुख यांना व त्यांच्या कुटुंबीयांना चौकशीसाठी समन्स बजावूनही ते गैरहजर राहिले आहेत. त्यामुळे अनिल देशमुख यांना शोधण्यासाठी ईडी ठिकठिकाणी छापे टाकत असल्याची चर्चा सुरू आहे. त्याचे खंडन करताना ॲड. इंदरपाल सिंग म्हणाले, ‘सोमय्या हे जाणीवपूर्वक माध्यमांची दिशाभूल करीत आहेत. वास्तविक देशमुख हे ई-मेलच्या माध्यमातून त्यांच्या संपर्कात आहेत. त्यांची पत्नी आरती देशमुख या प्रकृती व कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कार्यालयात हजर राहू शकत नाहीत. त्यांचा अधिकृत प्रतिनिधी म्हणून आपण ईडीला त्यांना हवी असलेली कागदपत्रे सादर केली आहेत.’