शिरवणेमध्ये वेश्याव्यवसाय अड्ड्यावर छापा
By admin | Published: July 4, 2014 04:12 AM2014-07-04T04:12:18+5:302014-07-04T04:12:18+5:30
पोलिसांच्या समाजसेवा शाखेने शिरवणेमध्ये छापा टाकून वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या ९ मुलींची सुटका केली आहे
नवी मुंबई : पोलिसांच्या समाजसेवा शाखेने शिरवणेमध्ये छापा टाकून वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या ९ मुलींची सुटका केली आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून एकजण पळून गेला आहे.
शिरवणेमधील हरबंश अपार्टमेंटमधील एका सदनिकेमध्ये वेश्याव्यवसाय करण्यासाठी काही मुलींना ठेवले असल्याची माहिती पोलिसांच्या समाजसेवा शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मीरा बनसोडे यांच्या पथकाने सदर ठिकाणी १ जुलैला धाड टाकली. येथून ९ मुलींची सुटका करण्यात आली असून त्यांना चेंबूरमधील महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
पोलिसांनी सदर अड्डा चालविणाऱ्या राजेशकुमार यादव व लखन यादव या दोन तरुणांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता ५ जुलैपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणी छोटू नावाचा आरोपी पळून गेला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. गुन्हे शाखेचे पोलिस उपआयुक्त श्रीकांत पाठक, रणजित धुरे यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे. या गुन्ह्यात अजून कोणाचा समावेश आहे का याचाही शोध घेतला जात आहे. (प्रतिनिधी)