वेश्याव्यवसाय आपल्याच समाजाची निर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2022 09:55 AM2022-06-05T09:55:15+5:302022-06-05T09:56:19+5:30

वेश्यांची स्थिती, त्यांच्यावर होणारे अत्याचार खूप भयानक आहेत. त्यांना पोलिसांचा होणारा त्रास कमी होणे हे दिवास्वप्न आहे, असे स्वयंसेवी संस्था सांगतात. 

Prostitution is the creation of our own society | वेश्याव्यवसाय आपल्याच समाजाची निर्मिती

वेश्याव्यवसाय आपल्याच समाजाची निर्मिती

googlenewsNext

- समीर परांजपे, मुख्य उपसंपादक, मुंबई

देहविक्रय हा व्यवसाय आहे. स्वत:च्या मर्जीने वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांना पोलिसांनी त्रास देऊ नये, त्यांच्यावर कारवाई करू नये असा महत्त्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी दिला. त्या आदेशाचे तंतोतंत पालन पोलिसांनी करायलाच हवे. मात्र वस्तुस्थिती अशी आहे की, देशातील वेश्यावस्त्यांमध्ये पोलिसांचा मोठ्या प्रमाणावर हस्तक्षेप सुरुच आहे.
वेश्यागमन हे समाजाने अनैतिक ठरविले आहे. त्यामु‌ळे वेश्यागृहांमध्ये चालणाऱ्या गोष्टींकडेही त्याच हीन नजरेने पाहिले जाते. सलाम बॉम्बेसारखा चित्रपट ज्यांनी पाहिला असेल त्याला तिथले वास्तव चित्र अधिक कळू शकेल. वेश्याव्यवसायाबद्दल फार उघडपणे चर्चा केली जात नाही. मुंबईतील कामाठीपुरा हा भाग वेश्याव्यवसायासाठीच ओळखला जातो. तिथल्या वेश्यांचे आरोग्याचे, आर्थिक दुर्बलतेचे अनेक प्रश्न आहेत. त्यांना होणारी मुले भणंगासारखी जगतात. त्यांच्या पुनर्वसनासाठी कामाठीपुऱ्यामध्ये काही स्वयंसेवी संस्था प्रकल्प चालवितात. मात्र वेश्यांची समस्याच इतकी मोठी आहे 
की, त्यांची दुरवस्था अजून कित्येक वर्षे संपण्याची 
शक्यता नाही. 

ही कृत्ये बेकायदा
भारतात वेश्याव्यवसाय बेकायदा ठरविण्यात आलेला नाही. मात्र एखाद्या महिलेला फसवून वेश्याव्यवसायात आणणे, वेश्यागृह चालविणे, या व्यवसायात दलाल म्हणून काम करणे ही कृत्ये भारतीय दंड संहितेतील काही तरतुदींनुसार बेकायदेशीर ठरविण्यात आली आहे. अशा प्रकरणांतील आरोपींना योग्य ती शिक्षा होऊ शकते. 
मानवी तस्करी रोखा
महिला, लहान मुले विशेषत: मुलींची होणारी मानवी तस्करी हे वेश्याव्यवसाय वाढण्याचे मूळ कारण आहे. गरीब राज्यांतील, शेजारी देशांतून गरीब घरच्या मुलींना फूस लावून, फसवून आणले जाते व मुंबई, कोलकातापासूनच्या सर्व वेश्यागृहांच्या अंधारात ढकलून दिले जाते. एड्ससारख्या रोगांनी ग्रस्त असलेल्या वेश्यांचे प्रश्न तर अतिशय गंभीर आहेत. मात्र त्याकडे कोणीही फार गांभीर्याने पाहात नाही. देशातील प्रत्येक नागरिकाला सन्मानपूर्वक जगण्याचा अधिकार राज्यघटनेने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात त्या हक्काचीही दखल घेतली आहे. पण वेश्यांची स्थिती, त्यांच्यावर होणारे अत्याचार इतके भयानक आहेत की, पोलिसांचा त्रास कमी होणे वगैरे हे दिवास्वप्न आहे असे वेशांच्या पुनर्वसनासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था सांगतात.

थायलंडची अर्थव्यवस्था 
तरली वेश्याव्यवसायावर
वेश्याव्यवसायासाठी प्रसिद्ध असलेला देश म्हणजे 
थायलंड. तिथे कायद्याने वेश्याव्यवसायाला बंदी आहे, 
मात्र त्या कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी 
करण्याच्या कोणी तिथे फारसे फंदात पडत नाही. 
त्यामुळे तेथील लालबत्तीचे विभाग, मसाज पार्लर, गो गो बार्स, सेक्स फोकस्ड् काराओके बार यांची मजा लुटण्यासाठी जगभरातून लाखो पर्यटक थायलंडला येत असतात. वेश्याव्यवसाय, मसाज पार्लर, स्पा आदी व्यवसायातून जे पैसे मिळतात, त्यातून थायलंडची अर्थव्यवस्था बहरली आहे. जर्मनीत वेश्याव्यवसाय हा कायदेशीर व संघटित व्यवसाय आहे. हा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या उत्पन्नावर सरकारला कर भरावा लागतो. अमेरिकेसह इतर देशांतही वेश्याव्यवसायाबाबत असलेल्या कायदेशीर तरतुदी तिथल्या वेश्यांचे शोषण करणाऱ्या नक्कीच नाहीत.

Web Title: Prostitution is the creation of our own society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.