मुंबई : विलेपार्लेच्या थाई व्हिला आॅथेन्टीक स्पामध्ये मसाजच्या नावाखाली थायलंडच्या तरुणींकडून वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे गुन्हे शाखेच्या कारवाईतून उघड झाले आहे. या कारवाईत सहा थायलंडच्या रहिवासी असणाऱ्या तरुणींची सुटका करत, व्यवस्थापकाला अटक करण्यात आली आहे.विलेपार्ले पूर्वेकडे रिशी इमारतीच्या तळमजल्यावर थाई व्हिला आॅथेन्टीक स्पाचे २०१७ मध्ये अभिनेत्री रवीना टंडनच्या हस्ते उद्घाटन झाले. हा स्पा शुरा प्रायव्हेट लिमिटेडच्या शुरा खान आणि तिचा भावी पती सुमीत सिंघानिया, मेहजबीन खान यांच्या मालकीचा आहे. या स्पामध्ये मसाजच्या नावाखाली थायलंडच्या तरुणींकडून वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष ९ ला मिळाली. त्यानुसार, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष ९ च्या प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक आशा कोरके यांच्या पथकाने तपास सुरू केला. यात साहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर जाधव, पोलीस अंमलदार बी. शिंदे, रवींद्र गावकर, राजेंद्र पेडणेकर, प्रफुल्ल पाटील, सचिन राऊत, अमित महांगडे, शीतल लाड आणि सचिन निकम यांनी शनिवारी रात्री बनावट ग्राहक पाठवून प्रकरणाची शहानिशा केली.तेथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खात्री पटताच पथकाने छापा टाकत सहा तरुणींची सुटका केली. नोकरीसाठीच्या व्हिसावर त्या मुंबईत आल्या. घटनास्थळावरून एक लाख २३ हजार रुपयांसह लॅपटॉप, एक स्वाइप मशीन, तीन व्हाऊचर बुक आणि कागदपत्रे पथकाने जप्त केली आहेत. या प्रकरणी विलेपार्ले पोलीस ठाण्यात शुरा, सुमीत तसेच मेहजबीनसह व्यवस्थापक के. रॉड्रिक्सविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पार्ल्यात स्पामध्ये मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2019 11:15 PM