अतुल कुलकर्णी, मुंबई राष्ट्रवादीचे आ. जितेंद्र आव्हाड यांच्या पोलीस संरक्षणात वाढ करण्यात यावी, अशी शिफारस परिमंडळ १च्या गुन्हा अन्वेषण विभागाच्या विशेष शाखेने केली आहे. तसा अहवाल वरिष्ठांना पाठविण्यात आला आहे. मात्र, अद्याप तरी आव्हाड यांच्या संरक्षणात वाढ करण्यात आलेली नाही. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नरेंद्र दाभोलकर तसेच कॉ. गोविंद पानसरे यांचे आरोपी मोकाट असताना व या दोन्ही हत्यांमागे अभिनव भारत, सनातन संस्थेसारख्या हिंदुत्ववादी संघटनांचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे आव्हाड यांनी चौकशी अधिकाऱ्यांना सांगितल्याचे पोलिसांच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या संस्थांच्या विरुद्ध सातत्याने आवाज उठवला जात असल्याने नथुराम विचार मंच तसेच निनावी पत्राद्वारे तसेच फेसबूकवरदेखील आपल्याला धमक्या मिळाल्या आहेत. सध्या ठाणे पोलिसांकडून आव्हाड यांना संरक्षण असले तरी मिळणाऱ्या धमक्या लक्षात घेता संरक्षणात वाढ होणे गरजेचे आहे, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.
जितेंद्र आव्हाडांना संरक्षण द्या
By admin | Published: July 24, 2015 2:23 AM