ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 - अपघातानंतर जबाबदारी स्वीकारायला नकार देणा-या उबर कंपनीला खार येथे राहणा-या महिलेने कायदेशी नोटीस पाठवली आहे. उबरच्या भारतातील कार्यालयालाच नव्हे तर, सॅन फ्रान्सिस्को येथील मुख्यालयाला नाहीद अली (40) यांनी नोटीस पाठवली आहे. नाहीद यांचे पती रेझा अबीद अली (43) यांना चार महिन्यांपूर्वी उबर टॅक्सीने धडक दिली.
रुग्णालयात दाखल केल्यापासून ते कोमामध्ये असून त्यांच्या मेंदूवर सात शस्त्रक्रिया झाल्या आहेत. पण त्यांच्या प्रकृतीत काहीही फरक पडलेला नाही. नाहीदने उबरचे संस्थापक ट्रावीस कालानिक यांच्या नावे पाठवलेल्या नोटीसमध्ये फक्त उपचाराचा खर्चच नव्हे तर, कुटुंबालाही नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. अपघातात जखमी झालेले रेझा अबीद घरातील एकमेव कमावते व्यक्ती आहेत.
आई, बहिण आणि दोन मुले असा त्यांना परिवार आहे. अपघातामुळे जे नुकसान झाले ते कधीही भरुन येणार नाही पण नुकसानभरपाईमुळे मुलांचे भविष्य सुरक्षित होईल असे नोटीसमध्ये म्हटले आहे. अपघातानंतर रेझा अबीद यांना तात्काळ भाभा रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर बॉम्बे रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांच्या उपचारावर कुटुंबाने आतापर्यंत 60 लाख खर्च केले आहेत.
महालक्ष्मी येथे नोकरी करणारे रेझा अबीद 14 नोव्हेंबर रोजी बाईकवरुन घरी परतत असताना बांद्रयामध्ये त्यांच्या बाईकला उबर कारने धडक दिली. कारचा चालक अपघातानंतर पळ काढत होता पण तिथे असणा-या वाहतूक पोलिसाने त्याला पकडले. ही धडक इतकी जोरदार होती की, रेझा काही फुटांवर जाऊन पडले त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यानंतर त्यांना तात्काळ जवळच्या भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले.