मानवाला भरपूर देणाऱ्या समुद्राचे रक्षण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 01:12 AM2019-06-08T01:12:47+5:302019-06-08T01:12:54+5:30
जागतिक महासागर दिन : प्रदूषणापासून दुर्मीळ प्रजातींचे जतन करा
मुंबई : मानवाच्या आयुष्यामध्ये समुद्राचे स्थान महत्त्वाचे आहे. आपल्याला झाडेच ऑक्सिजन देतात असे वाटते. परंतु समुद्रातून ७० टक्के ऑक्सिजन मानवाला मिळतो. समुद्रातील माशांचे सेवन केले जाते. त्यांच्यापासून प्रोटिन मिळते. पाऊस समुद्रावर अवलंबून असतो. जलवाहतूक समुद्राशी निगडित असते. समुद्रातील काही दुर्मीळ सागरी प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांचे जतन आणि संवर्धन करणे गरजेचे आहे. उच्च यांत्रिकी क्षमतेपासून ते पारंपरिक पद्धतीची मासेमारी या सागरी क्षेत्रात केली जाते, अशा महत्त्वपूर्ण गोष्टी समुद्र आपल्याला देत असेल तर त्याचा आदर मानवाने केला पाहिजे, अशी प्रतिक्रिया सागरी क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली.
मरिन लाइफ ऑफ मुंबईचे समुद्री जीव अभ्यासक प्रदीप पाताडे यांनी यासंदर्भात सांगितले की, मुंबईतले समुद्रकिनारे हे प्रदूषित झाले आहेत. त्यामुळे या समुद्रकिनाऱ्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. तरी मुंबईच्या किनारपट्टीवर दुर्मीळ सागरी प्रजाती आणि सागरी जैवविविधता आजही आपले अस्तित्व टिकवून आहे. त्याची जपणूक करणे मानवाची जबाबदारी आहे. यासाठी आपण प्रदूषण कमी केले पाहिजे. गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी, हाजी अली, वांद्रे कार्टर रोड, बॅण्ड स्टॅण्ड, वर्सोवा बीच, मढ जेट्टी, आक्सा बीच, गोराई खाडी या भागात समुद्री जैवविविधता आढळून येते. वाढते प्रदूषण, नदी-नाल्यांतून येणारे सांडपाणी थेट समुद्रामध्ये सोडले जात असूनही मुंबईतल्या काही समुद्री प्रजाती आजही तग धरून आहेत.
या आहेत संकटग्रस्त प्रजाती!
देशातील वन्य जीवन संरक्षण अधिनियमांतर्गत व महाराष्ट्राच्या सागरी मासेमारीदरम्यान प्रामुख्याने आढळणारे दुर्मीळ आणि संकटग्रस्त संरक्षित सागरी प्रजातींमध्ये नाळी/ करवत मासा, लांज/ रांजा, काटेदार पाकट, मोरी/ मुशी/ वाटू, महाकाय गोबरा/ हेकरू, बहिरी/ देवमूशी इत्यादींचा समावेश होतो.
समुद्री सस्तन प्राण्यांमध्ये बुलिया, देवमासा (व्हेल), गादा रेडा (डॉल्फिन), समुद्री कासव, समुद्री सर्प, समुद्री घोडा, फणी, प्रवाळ, स्पॉज, समुद्री काकडी इत्यादींचा संकटग्रस्त संरक्षित सागरी प्रजातींमध्ये समावेश होतो.
५२६ गावांत मासेमारी प्रमुख व्यवसाय
समुद्री जीव अभ्यासक व संशोधक स्वप्निल तांडेल यांनी सांगितले की, देशातील सर्वांत मोठ्या समुद्री उत्पादकांपैकी महाराष्ट्र राज्य एक आहे. महाराष्ट्राला ७२० किलोमीटरचा समुद्रकिनारा आहे. या किनाºयालगत असणाºया ५२६ गावांत प्रमुख व्यवसाय हा मासेमारी आहे तर मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील सुमारे ५ लाख भागधारक आहेत.