मुंबई : कोकणातील समुद्रात होणाऱ्या एलईडी मासेमारीला बंदी घालण्यासाठी आता मत्यविकास विभागाच्या अधिकाऱ्यांसह पोलिसांचे संरक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी समुद्रात गस्ती घालण्यासाठी सहा नवीन बोटी खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.एलईडी मासेमारी बंदी कायद्यासंदर्भात पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीला मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, पशु व दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आमदार वैभव नाईक, अशोक पाटील, तुकाराम काते, मत्स्यविकास आयुक्त अरुण विधळे, सागरी सुरक्षाचे सहायक आयुक्त एस.एस. घोळवे आदी उपस्थित होते. गस्ती बोटींच्या खरेदीसाठी ५१ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती या वेळी देण्यात आली.एलईडी मासेमारीवर कठोर कारवाई करण्यासाठी राज्य सरकार धोरण तयार करीत असून कायदा तयार करण्याची प्रक्रिया सुरु आहे. लवकरच या संदर्भातील अध्यादेश काढण्यात येणार आहे.एलईडी मासेमारीवर कारवाई करण्यासंदर्भात राज्यात स्वतंत्र कायदा अस्तित्वात नव्हता. या संदर्भात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांची भेट घेऊन कारवाई करण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली आहे, असे कदम यांनी सांगितले.
कोकणात एलईडी मासेमारी बंदीला पोलीस संरक्षण, ६ नव्या बोटी खरेदी करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 4:01 AM