Join us

मुलांना जपा; श्वसनविकार, न्यूमोनियाचे रुग्ण वाढले! डॉक्टरांनी केले आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2024 3:31 PM

न्यूमोनिया हा आजार कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकतो. या आजारात जिवाणूंमुळे फुप्फुसात पाणी होते.

मुंबई : गेल्या काही महिन्यांत  वातावरण बदल, व्हायलर संसर्ग आणि प्रदूषणामुळे श्वसनविकाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. काही रुग्ण लक्षणांनुसार घरच्या घरी गोळी घेऊन उपचार करत आहेत, तर काही रुग्ण मात्र अतित्रास होत असल्यामुळे सरकारी दवाखान्यात किंवा रुग्णालयात उपचारासाठी धाव  घेत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे लहान मुलांमध्ये श्वसनविकारासह मोठ्या प्रमाणात न्यूमोनिया आणि तापाची लक्षणे दिसत आहेत.      न्यूमोनिया हा आजार कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकतो. या आजारात जिवाणूंमुळे फुप्फुसात पाणी होते. हा एक श्वसनविकार आहे.  यामध्ये रुग्णाचा ताप अनेक दिवस जात नाही. त्यासाठी डॉक्टर त्यांना अँटिबायोटिक्सची औषधीसुद्धा देतात. काही वेळा न्यूमोनियाच्या रुग्णांवर वेळेतच उपचार केले नाहीत, तर गुंतागुंत वाढू शकते, त्यावेळी रुग्णाला अतिदक्षता विभागात उपचारासाठी ठेवण्यात येते. विशेष करून ज्येष्ठ नागरिकांची या आजारात विशेष काळजी घेतली जाते. 

प्रदूषणाच्या पातळीमध्ये वाढमुंबई शहरात जानेवारीपासून वातावरणात बदल झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात सर्दी, खोकला आणि तापाचे रुग्ण पाहायला मिळाले होते. काही रुग्णांना दोन ते तीन दिवसांत बरे वाटत होते, तर काही रुग्णांना मात्र आठवडाभर या आजाराचा त्रास सहन करावा लागत होता. वातावरण बदलासह प्रदूषणाच्या पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. त्यामुळे अनेक नागरिकांना त्रास होता.  त्यावेळी महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे इमारतीच्या बांधकाम करणाऱ्यांना विशेष सूचना काढून धुळीचा त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश दिले होते.  

न्यूमोनियाची लक्षणे -  श्वास घेताना अडथळा निर्माण होतो.  धाप लागते. -  धाप लागते, छातीत घरघर आवाज येतो. -   हृदयाच्या ठोक्यांची गती वाढते. -  थंडी वाजून ताप येतो. 

वातावरण बदल, प्रदूषण आणि व्हायरल संसर्ग यामुळे अनेकांना याचा त्रास होतो. या काळात ताप, सर्दी, खोकला यासारख्या लक्षणांचा नागरिकांना सामना करावा लागतो. या काळात थंड पदार्थ मुलांनी खाल्ल्यामुळे श्वसनविकार होऊ शकतो. वेळीच उपचार केले नाहीत, तर त्यांना न्यूमोनियाचा त्रास होण्याची शक्यता असते. महिन्याला ओपीडीमध्ये हजारापेक्षा अधिक रुग्ण या आजाराची लक्षणे घेऊन येत असतात. रोगप्रतिकारकशक्ती चांगली ठेवणे गरजेचे आहे.- डॉ. मधुकर गायकवाड, सहयोगी प्राध्यापक, सर जेजे रुग्णालय 

टॅग्स :हॉस्पिटलडॉक्टर