मुंबई : आझाद मैदानातील एजीबीटीक्यू कार्यक्रमादरम्यान शारजील इमामच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केल्याने पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा नोंदविलेल्या २२ वर्षीय टिसच्या विद्यार्थिनीला उच्च न्यायालयाने तीन आठवडे अटकेपासून अंतरिम दिलासा दिला.उर्वशी चुडावाला हिने दाखल केलेल्या अटकपूर्व जामिनावर उच्च न्यायालयात सुनावणी होती. ११ फेब्रुवारी रोजी उच्च न्यायालयाने चुडावाला हिला अटकेपासून अंतरिम दिलासा दिला. तसेच पोलिसांनी तिला अटक केल्यास तिची २५ हजार रुपये जातमुचलक्यावर सुटका करावी, असे न्यायालयाने गेल्या आदेशात स्पष्ट केले आहे.सोमवारच्या सुनावणीत न्यायालयाने चुडावाला हिला आणखी तीन आठवडे अटकेपासून संरक्षण दिले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, एलजीबीटीक्यूने गेल्या आठवड्यात आझाद मैदानावर आंदोलन केले. यावेळी चुडावाला हिने ‘शारजील तेरे सपनो को हम मंजिल तक पहुचायेंगे’, अशा घोषणा दिल्या.चुडावालाचे वकील मिहीर देसाई यांनी न्यायालयाला सांगितले की, चुडावाला हिने मोबाइलवर आलेला संदेश वाचून घोषणा दिल्या. त्या तिला कोणीतरी पाठवल्या होत्या. तर, आपण एका समुदायाच्या विरोधात द्वेष निर्माण करण्यासाठी घोषणा दिली, असा आरोप आपल्यावर आहे. घोषणा एका विशिष्ट समाजाच्या लोकांना आवडली नाही, याचा अर्थ देशद्रोहाचा गुन्हा नोंदविला जाऊ शकत नाही, असे चुडावाला हिने अटकपूर्व जामीन अर्जात म्हटले आहे.
देशद्रोहाप्रकरणी उर्वशी चुडावालाला अटकेपासून तीन आठवडे संरक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 3:19 AM