आम्हाला संरक्षण द्या! निवासी डॉक्टरांची आयुक्तांकडे मागणी
By संतोष आंधळे | Published: May 4, 2024 10:14 PM2024-05-04T22:14:15+5:302024-05-04T22:14:32+5:30
गेल्या वर्षी राज्यातील शासकीय रुग्णलयातील निवासी डॉक्टरवर हल्ला होण्याच्या आठ घटना घडल्या होत्या. मात्र या घटना सातत्याने वाढत असल्याने निवासी डॉक्टरांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
मुंबई : निवासी डॉक्टरांवर रुग्णाच्या नातेवाईकांकडून होणाऱ्या हल्ल्याची घटना आता नवीन राहिली नाही. अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांवर शुक्रवारी हल्ला केल्याची घटना घडली. त्यामुळे राज्य निवासी डॉक्टर संघटनेने वैद्यकीय शिक्षण आयुक्त यांना पत्र लिहून रुग्णालयातील सुरक्षा वाढीविण्याची मागणी केली आहे.
गेल्या वर्षी राज्यातील शासकीय रुग्णलयातील निवासी डॉक्टरवर हल्ला होण्याच्या आठ घटना घडल्या होत्या. मात्र या घटना सातत्याने वाढत असल्याने निवासी डॉक्टरांमध्ये संतापाचे वातावरण आहे. कुठल्याही शासकीय रुग्णालय रुग्णाचा प्रथम निवासी डॉक्टरांसोबत सोबत संपर्क येतो. निवासी डॉक्टर हा त्या हॉस्पिटलचा कणा असतो. त्याच्याशिवाय रुग्णालय चालविणे कठीण असते. या गोष्टीची जाणीव प्रशासनसुद्धा आहे. मात्र या अशा प्रकारे होणाऱ्या हल्ल्यामुळे निवासी डॉक्टर या भयभीत वातावरणात मोकळ्या पणाने काम करू शकणार नाही.
शनिवारी राज्य निवासी डॉक्टर संघटनेने वैद्यकीय शिक्षण आयुक्त यांना पत्र देऊन रुग्णलयातील सुरक्षा वाढविण्याची मागणी केली आहे. यापूर्वी सुद्धा निवासी डॉक्टरवर रुग्णांच्या नातेवाईकांकडून हल्ला होण्याच्या घटना घडल्या आहेत. अनेकवेळा निवासी डॉक्टरांनी सुरक्षा वाढविण्यासाठी आंदोलन करून संप पुकारलेला होता.