पावसापासून करा बचाव तुमच्या सौंदर्याचा
By admin | Published: June 15, 2017 03:51 AM2017-06-15T03:51:14+5:302017-06-15T03:51:14+5:30
मान्सूनच्या आगमनामुळे प्रखर ऊन ओकणाऱ्या सूर्यापासून दिलासा मिळाला आहे. मात्र, पाऊस म्हटला की अतिरिक्त आर्द्रता आलीच. ती तुमच्या मेकअपचे
- अमित सारडा,
(वेलनेस अँड ब्युटी एक्स्पर्ट)
मान्सूनच्या आगमनामुळे प्रखर ऊन ओकणाऱ्या सूर्यापासून दिलासा मिळाला आहे. मात्र, पाऊस म्हटला की अतिरिक्त आर्द्रता आलीच. ती तुमच्या मेकअपचे नुकसान करू शकते तसेच त्यामुळे तुमच्या रूपाची पार वाट लागून जाते आणि तुमच्या मूडचीही. वॉटरप्रूफ सौंदर्यप्रसाधने आज बाजारात उपलब्ध आहेत आणि ती तुमचे काम करू शकतात. एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा ही सौंदर्यप्रसाधने तयार करण्यासाठी रसायनांचा वापर होतो, ही रसायने त्वचेसाठी चांगली नाहीत. त्याऐवजी तुम्ही खाली दिलेल्या नैसर्गिक आरोमाथेरपीच्या पर्यायाचा वापर केला तर तुमच्या त्वचेचे पावसापासून संरक्षण होईल.
स्वच्छता
पावसामुळे अतिरिक्त बाष्प निर्माण होते आणि सोबत त्वचेच्या समस्याही. त्यामुळे त्वचा स्वच्छ ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्वचेसाठी रसायनयुक्त, कठोर साबण वापरण्याऐवजी नैसर्गिक तेलांचा वापर करता येईल. सूक्ष्म जीवाणूंचा नाश करण्याची क्षमता असणारे अनेक प्रकारचे तेल आज बाजारात उपलब्ध आहे. उदा. नीम तेल. त्याचा वापर केल्यास त्वचेला दीर्घकाळासाठी लाभ होईल.
तेलाचा वापर करून निगा
पावसाळ्याच्या दिवसांत कोरडी त्वचा चांगली राहते. मात्र, तेलकट त्वचेसोबत तसे होत नाही. पावसाळ्यात अतिरिक्त बाष्पामुळे त्वचेखाली असणारे तेल बाहेर येते आणि त्यामुळे तुमचा चेहरा थकल्यासारखा दिसतो. त्याशिवाय मुरुम, पुरळ उमटते. हे टाळण्यासाठी खास तेलकट त्वचेसाठी तयार करण्यात आलेल्या आवश्यक तेलाने (इसेंशियल तेलाने) स्पेशल क्लीन्ज करून घ्या. यात जोजोबा, टी ट्री आणि लॅव्हेंडर अशी काही तेलं आहेत. प्रथम तुमचा चेहरा कोमट पाण्याने धुऊन घ्या. त्यानंतर या तेलाचे काही थेंब घेऊन हलक्या हाताने चेहऱ्यावर चोळा. काही मिनिटं थांबा त्यानंतर मायक्रोफायबर कापडाने पुसून काढा. त्यामुळे तुमच्या त्वचेवरील अतिरिक्त तेल काढून टाकले जाते आणि त्वचेचे पोषण होते.
वॉटरप्रूफ
मेकअप काढणे
वॉटरप्रूफ मेकअप उत्तम असतो. मात्र, त्यासाठी रसायनांचा वापर केलेला असतो. त्यामुळे तुमच्या त्वचेचे नुकसान होऊ शकते. असा मेकअप केवळ धुऊन किंवा पुसून घेऊन चालणार नाही. आॅलिव्ह आॅइल किंवा बदामाच्या तेलाचा वापर करून हा मेकअप काढा. कोणताही रसायनयुक्त साबण वापरू नका. त्यामुळे साबणाची कठोरता आणि मेकअपमधील घटकांचा विपरीत परिणाम त्वचेवर होऊ शकतो.
ओठांची काळजी
निरोगी ओठ छानच दिसतात. मात्र, हे ओठ पावसाळ्यात निरोगी ठेवणे काहीसे किचकट आहे. तुम्ही वॉटरप्रूफ किंवा नॉन ट्रान्सफरेबल लिपस्टिक वापरत असला तरी ओल्या वातावरणात तुमच्या ओठांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे थोडेसे जास्मिन किंवा लॅव्हेंडर तेल लिपस्टिक लावण्याआधी तुमच्या ओठांवर लावा. त्यामुळे ओठांवर नैसर्गिक लिप बामचा एक स्तर तयार होईल. महत्त्वाचे म्हणजे तुमच्या लिपस्टिकसाठी एक फाउंडेशन म्हणून ते काम करते आणि तुमच्या ओठांचे संभाव्य नुकसान टळते.
भुवया आणि पापण्या : आभाळ ढगाळलेलं असताना तुमच्या भुवया आणि पापण्यांची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. भुवयांसाठी नियमित थ्रेडिंड करत जा. त्याशिवाय आयब्रो पेन्सिलचा वापर कमीतकमी करा, अथवा पूर्णपणे या मोसमात टाळा. पापण्यांचा विचार केला तर कॅस्टर आॅइलचे काही थेंब पापण्यांच्या मुळाशी लावा, त्यामुळे त्या अधिक दाट आणि लांब होतील. त्यामुळे त्या अधिक नैसर्गिक आणि सुंदर दिसतील. थ्रेडिंग सेशन्सनंतर भुवयांची वाढ होण्यासाठी रोझमेरी तेल अथवा लॅव्हेंडर तेल त्यावर चोळल्यास फायदा होईल. नैसर्गिक तेलाचा वापर केल्यास तुमच्या त्वचेची काळजी घेतली जाण्याबरोबरच आवश्यक पोषक घटकही त्यातून मिळतील. नैसर्गिक इसेंशियल आॅइल वापरा आणि या पावसाळ्याचा आनंद घ्या.