पुरातत्त्व खाते करणार ‘त्या’ तोफांचे संरक्षण, १७व्या शतकातील दुर्लक्षित तोफा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 07:01 AM2018-03-11T07:01:28+5:302018-03-11T07:01:28+5:30
वडाळा येथील मुंबई पोर्ट ट्रस्ट अधिकारी वसाहतीमध्ये असलेल्या १७व्या शतकातील दोन तोफांच्या संरक्षणाची जबाबदारी राज्याच्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाने उचलण्याचा निर्णय घेतला आहे. तसे लेखी पत्रच संचालनालयाने कार्यकारी अभियंता कार्यालयाला पाठवले आहे. सह्याद्री प्रतिष्ठानने उचललेल्या या प्रश्नाला गुरुवारी ‘लोकमत’ने वाचा फोडली होती.
मुंबई - वडाळा येथील मुंबई पोर्ट ट्रस्ट अधिकारी वसाहतीमध्ये असलेल्या १७व्या शतकातील दोन तोफांच्या संरक्षणाची जबाबदारी राज्याच्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाने उचलण्याचा निर्णय घेतला आहे. तसे लेखी पत्रच संचालनालयाने कार्यकारी अभियंता कार्यालयाला पाठवले आहे. सह्याद्री प्रतिष्ठानने उचललेल्या या प्रश्नाला गुरुवारी ‘लोकमत’ने वाचा फोडली होती.
सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्ग संवर्धन विभागाचे अध्यक्ष गणेश रघुवीर यांनी शिवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक परशुराम आणि कार्यकर्त्यांच्या सहकार्याने या तोफांची सद्य:स्थिती ‘लोकमत’च्या माध्यमातून उघडकीस आणली होती. १७व्या शतकातील दोन तोफांना गंज लागल्याचे धक्कादायक वास्तवही या वेळी लोकमतने दाखवले होते. तसेच हा मौल्यवान ऐतिहासिक ठेवा चोरीला जाण्याची शक्यताही व्यक्त केली होती. त्याची तातडीने दखल घेत पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांनी तोफांच्या पाहणीचे आदेश दिले होते.
त्यानुसार संचालनालयाच्या अधिकाºयांनी वडाळा येथे जाऊन ८ मार्चला यासंदर्भातील दोन्ही तोफांची पाहणी केली. तसेच तोफांची सद्य:स्थिती ध्यानात घेऊन त्यांची पुरातत्त्वीयदृष्ट्या नोंद घेण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे. तसेच तोफांना संरक्षित ठिकाणी हलवण्याचा मानस व्यक्त करत मुंबई पोर्ट ट्रस्टकडे तोफांच्या स्थलांतरणाची परवानगी मागितली आहे.
मात्र, आता चेंडू मुंबई पोर्टच्या कार्यकारी अभियंता कार्यालयाच्या कोर्टात आहे. पोर्ट ट्रस्टनेही तत्काळ परवानगी द्यावी, अशी मागणी
सह्याद्री प्रतिष्ठानचे गणेश मांगले यांनी केली आहे.
मुंबईतील तोफांचा इतिहास काय सांगतो?
मुंबईमध्ये १७-१८व्या शतकात किल्ले उभे राहिले. त्यातील आज काही किल्ले जरी नामशेष झाले असले तरी काही किल्ले तग धरून उभे आहेत.
मुंबईत ११ किल्ल्यांची उभारणी झाली, त्यातील डोंगरी व माझगाव हे किल्ले नामशेष झाले आहेत.
सद्य:स्थितीत सायन अर्थात शिव किल्ल्यावर तोफा आहेत. सेंट जॉर्ज किल्ल्यात पुरतत्त्व विभाग कार्यालय असून तेथेही तोफ आहे. बॉम्बे कॅसल परिसरात तोफा ठेवण्यात आल्या आहेत.
च्मुंबईच्या नव्याने बांधणीत काही तोफा आढळल्या, त्यापैकी मंत्रालय येथे १० तोफा काळा रंग लावून ठेवलेल्या आहेत.
याउलट वडाळ्यात सापडलेल्या १७व्या शतकातील दोन्ही तोफा या मुंबईमधील इतर तोफांच्या मानाने सर्वात मोठ्या आहेत.
साधारण साडेसात फूट लांब व १.३ फूट रुंद असा व्यास असलेल्या या तोफा आहेत. त्यांना प्रत्येकी ६ रिंग्स असून या लांब पल्ल्याचा मारा करण्यासाठी वापरल्या जात असल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.