नागरीकांच्या जीविताचे रक्षण हीच सरकारची प्राथमिकता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2020 05:07 PM2020-10-24T17:07:11+5:302020-10-24T17:08:02+5:30
The Government : विश्व हिंदू परिषदेच्या आंदोलनावर ओढले ताशेरे
मुंबई : विश्व हिंदू परिषदेने धार्मिक स्थळ उघडण्यासाठी आयोजित केलेल्या मोर्चा संदर्भात मुंबई शहराचे पालकमंत्री व राज्याचे मत्स्यव्यवसाय, वस्त्रोद्योग आणि बंदर खात्याचे मंत्री अस्लम शेख यांनी जोरदार टिका केली आहे.
अस्लम शेख म्हणाले की, विश्व हिंदुपरिषदेच्या लोकांना आजच्या घडीला धर्मस्थळ उघडणं हा जनतेच्या जीविताच्या सुरक्षिततेपेक्षा महत्त्वाचा मुद्दा वाटतो हीच खरी शोकांतिका आहे. केंद्र सरकारने इतक्या दिवसांमध्ये सर्व राज्यांसाठी धार्मिक स्थळ उघडण्याच्या बाबतीत आदर्श कार्यप्रणाली का नाही आखून दिली, असा सवालही त्यांनी विचारला.
धार्मिक स्थळ उघडण्यासाठी मोर्चा काढण्यापेक्षा प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन करण्यासाठी जर विश्व हिंदू परिषदेचे लोक रस्त्यावर उतरले असते, तर ते जनतेच्या हिताचं ठरलं असतं असे मत त्यांनी व्यक्त केल.
देशाच्या सीमेवर चीनच्या चाललेल्या आक्रमक हालचाली, घसरणारा जीडीपी, वाढती बेरोजगारी या मुद्यांवर मौन राहायचं आणि विश्व हिंदू परिषदेसारख्या धार्मिक संस्थांना पुढे करुन आपला राजकीय अजेंडा चालवायचा, यावरुन भाजपाचे नेते किती खालच्या स्तरावर जाऊन राजकारण करत आहेत याच प्रात्यक्षिक मिळत असा टोला त्यांनी लगावला.
महाविकास आघाडीचे सरकार लवकरच धार्मिक स्थळं उघडण्याच्या संदर्भात एक आदर्श कार्यप्रणाली आखेल. त्यानंतर महाराष्ट्रातली धार्मिक स्थळं उघडण्यात येतील, असेही त्यांनी शेवटी स्पष्ट केले.